The pre-monsoon storm in the state!
राज्यभरात हजारो वृक्ष कोसळले, ९ जण दगावले; विदर्भ, खान्देशालाही तडाखा
मुंबई : पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात राज्यभरात ठिकठिकाणी हजारावर वृक्ष उन्मळून पडले. या पावसाने मराठवाडा, खान्देश, विदर्भ व नगर जिल्ह्यात मिळून एकूण ९ जण दगावले आहेत. या वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून मात्र आठवडाभर लांबला आहे.
केरळ व तामिळनाडूच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात मात्र मान्सूनपूर्व पावसाने रविवारी राज्यभरात दाणादाण उडवली.
मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यात एकूण ३६९ वृक्ष उन्मळून पडले. यात छत्रपती संभाजीनगरात २८६ व जालन्यात ८० वर झाडे पडली. छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यात वीज पडून दोन जण दगावले. तर पैठण तालुक्यात झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडीत कृष्णा मेटे (२३) याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात किनवटला २ व परभणीतील मानवत शहरात एक झाड पडले.
कन्नड तालुक्यातील चापानेर येथे वीज पडून गोठ्याला आग लागली. याशिवाय उंडणगाव-गोळेगाव रस्त्यावर असलेल्या रामकुंडवाडी येथे पत्र्याच्या व कुडाच्या शेडवर वीज पडून त्यात आश्रयासाठी थांबलेले शेतकरी कुटुंब आणि मजूर असे एकूण आठ जण भाजले. मानवत शहरात नवा मोंढा परिसरात दुकानाशेजारी असलेले झाड दुकानावर पडल्याने दुकानाचे मोठे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात पहाटे मान्सूनपूर्व पाऊस झाला.
दरम्यान, मान्सून रविवारीदेखील केरळमध्ये पोहोचू शकलेला नाही. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज त्यामुळे खरा ठरला. मान्सून केरळपासून २५० किलोमीटरवर अरबी समुद्रात तीन दिवसांपासून मुक्कामी आहे. दक्षिण अरबी सागरात पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल असे वातावरण तयार होत आहे. पुढील तीन-चार दिवसांत मान्सून धडकण्याची शक्यता आहे.
पुढील तीन दिवसांत देशातील इतर भागातही वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर पूर्व आंध्र प्रदेश आणि विदर्भात ८ जूनपर्यंत उष्णतेची लाट येऊ शकते. तेलंगणात ६ जून व दक्षिण पूर्व उत्तर प्रदेशात ७ जूनपर्यंत या लाटेची शक्यता आहे. राजस्थान, मध्य प्रदेशातील काही भागात धुळीच्या वादळासह पाऊस होऊ शकतो.