सातोळी तिठा येथे गोवंश वाहतुक रोखली : तिघांविरोधात गुन्हा दाखल
सावंतवाडी: सातोळी तिठा येथे अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दशरथ एकनाथ मयेकर (३५, रा. माझगाव न्यू गरड, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), लखाजी जिमु थोरवत (४०, रा. चितळे धनगर वाडा, पो. वाटिंगे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) आणि यमाजी बाबू कस्तुरे (३५, रा. चितळे धनगर वाडा, पो. वाटिंगे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम एच-०७ पी-१६१३ या क्रमांकाच्या गाडीतून दोन बैल निर्दयतेने आणि चाऱ्याची व्यवस्था न करता वाहतूक करत असल्याचे आढळले. या गोवंशाच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेला परवाना किंवा मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र त्यांच्याकडे नव्हते. तसेच, हे बैल कत्तलीसाठी नेण्याचा उद्देश असल्याचेही निदर्शनास आले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहन ताब्यात घेतले व दोन्ही बैलांना सुरक्षितपणे गोशाळेत जमा करण्यात आले आहे.
सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र बांदेकर, मनीष शिंदे, रुक्मांगद मुंडे आणि अमोल गोसावी यांनी ही कारवाई यशस्वी केली. पुढील तपास सुरू आहे.











