रत्नागिरी : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लब शहरात आयोजित सायकल रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यात आबालवृद्धांसह महिला असे १०९ हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अन्य पोलिसांनी देखील या रॅलीत सुरवातीपासून शेवटपर्यंत सायकल चालवून सर्व सायकलस्वारांना प्रोत्साहन दिले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या उपक्रमाचे कौतुक करून शहरात आम्हालाही सायकलवरून गस्त घालता येऊ शकते का असे मनोगत व्यक्त केले.
दरवर्षी ३ जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा होता. यानिमित्त जगभरात विविध उपक्रम आयोजित केले जातात. रत्नागिरीत काल रविवारी यानिमित्त सकाळी ७ वाजता मारुती मंदिर येथून सायकल रॅलीला सुरवात करण्यात आली. याप्रसंगी पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे कार्य सुरेख प्रकारे सुरू आहे. सायकलिंगमुळे शरीराचा चांगला व्यायाम होतो व माणूस तंदुरुस्त राहतो. लहान-मोठ्यांनी सायकलिंग केले पाहिजे. रत्नागिरी जिल्हा पोलिस दल आपल्या सर्व उपक्रमात सहभागी होईल. श्री. कुलकर्णी यानी या रॅलीमध्ये स्वतः सायकल चालवली. त्यांनी सर्व सहभागी सायकलस्वारांना प्रोत्साहित केले. सायकलवरून पेट्रोलिंग केले पाहिजे, असा विचार या रॅलीच्या निमित्ताने माझ्या मनात आल्याचे त्यांनी मनोगतादरम्यान सांगितले.
त्यानंतर रॅलीला सुरवात झाली. या रॅलीने रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. रॅलीमध्ये वय वर्ष ७ ते वय वर्ष ७८ या वयोगटातील १०९ सायकलप्रेमी सहभागी झाले. यात लहान मुलांसह डॉक्टर, वकील, व्यावसायिक, बँकर्स, विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि आरसीसीचे रायडर्स सहभागी झाले. वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची रॅली ठरल्याप्रमाणे वेळेत सकाळी ७ वाजता मारुती मंदिर सर्कल इथून सुरू झाली. नाचणे, साळवी स्टॉप, माळनाका, रामआळी, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, टिळक आळीमार्गे मांडवी येथपर्यंत काढण्यात आली.
रॅलीदरम्यान विविध घोषणा सायकलप्रेमींकडून देण्यात आल्या. भारतमाता की जय, सायकल चालवा, तंदुरुस्त राहा, एक, दोन, तीन चार रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा जयजयकार, अशा घोषणा दिल्या. सांगतेदरम्यान रत्नागिरीतील एकमेव डबल एसआर अमित कवितके, एसआर यतिन धुरत, एसआर डॉक्टर नितीन सनगर यांनी सर्व सायकलप्रेमींना सायकलविषयक मार्गदर्शन केले. याप्रसंगी २० वर्षांखालील सायकलप्रेमींसाठी खास लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यातून अनेकांनी सायकलच्या नवनवीन वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. सर्वांत महत्वाचे म्हणजे कोणतेही प्रायोजकत्व न घेता सायकलप्रेमींच्या, समस्त रत्नागिरीकरांच्या आणि पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबने ही रॅली यशस्वी केली. सायकलपट्टूंसाठी पाणी, अल्पोपहाराची व्यवस्था, डिझाईन, प्रिंटिंग आदी सर्व व्यवस्था रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केली आणि समस्त रत्नागिरीकरानी त्याला उदंड प्रतिसाद दिला. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा उपक्रम म्हणजे नियोजन, शिस्तबद्ध, वक्तशीर आणि सर्वसमावेशक असतो ही सर्वसामान्य रत्नागिरीकरांची भावना अजूनच दृढ झाली.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य व्हा
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य होण्याकरिता आठवड्याला किमान ७५ व महिन्याला किमान ३०० किमान किलोमीटर सायकल चालवण्याची अनोखे शुल्क आकारले जाते. रत्नागिरीत सध्या १०० हून अधिक सायकलस्वार क्लबचे सदस्य असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर अनेक सायकलिस्ट आता रत्नागिरीच्या रस्त्यावर दिसू लागले आहेत. रत्नागिरीत सायकलसंस्कृती सुरू व्हावी आणि वृद्धिंगत व्हावी यासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब अनेकविध उपक्रम राबवत आहे.