पाग बौध्दवाडी येथील नागरिकांनी अंडर बायपास संदर्भात मांडली कैफियत

आ. निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांशी केली सविस्तर चर्चा

चिपळूण (प्रतिनिधी):- मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरण लोकांच्या सोयीसाठी होत आहे. मात्र, गैरसोय होणार असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. पाग येथील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने अंडर बायपास संदर्भात केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याशी खासदार नारायण राणे चर्चा करीत आहेत. तर पालकमंत्री ना. उदय सामंत आणि आम्ही विषयात लक्ष घातलेले आहे. तोपर्यंत अंडरपास आहे, असे गृहीत धरून काम करा. नंतर बदल होतील, असे काही करू नका, अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

 

 

कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी पाग येथील ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे पाग बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी होत असलेल्या त्रासासंदर्भात निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे. यानुसार पाग बौद्धवाडी ही वस्ती महामार्गाजवळच असून येथील नागरिकांची सतत रेलचेल असते व शेकडो वाहने ये- जा करीत असतात. अशा परिस्थितीत रस्ता ओलांडणे म्हणजे मृत्यूला कवटाळणे सारखे आहे. कारण हे काम सुरू झाल्यापासून अनेक अपघात झालेले आहेत. म्हणून नागरिकांना पलीकडे जाणे येण्यासाठी अंडर बायपास किंवा पर्यायी मार्ग ठेवण्यात यावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले असून या विषयात आपण लक्ष घालावे, अशी मागणी पाग येथील नागरिकांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे करतांना काही समस्या देखील या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

 

यावर निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, पाग बौद्धवाडी येथील रहिवाशांच्या सोयीच्या दृष्टीने अंडर बायपास संदर्भात जो निर्णय होईल. तेव्हा नागरिकांची बैठक घ्या. त्यांना त्याची माहिती द्या. परत प्रश्न निर्माण व्हायला नको. तोपर्यंत अंडर बायपास आहे, असे गृहीत धरून काम करा. नंतर बदल होतील, असं काही करू नका. वरिष्ठांशी तुम्हीही बोला आणि आम्हीही बोलतो असे, या अधिकाऱ्यांना सांगितले.

 

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, दिलीप चव्हाण, युवासेना तालुकप्रमुख निहार कोवळे, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, माजी नगरसेवक महम्मद फकीर, माजी नगरसेवक करामत मिठागरी, उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, महेश सकपाळ, आप्पा सकपाळ, डॉ. सकपाळ, माजी नगरसेविका उज्वला जाधव आदी उपस्थित होते.