Hindu Empire Day celebrated at Devrukh
प्रतिनिधी | देवरुख : देवरुख येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवरूख तालुक्याच्या वतीने हिंदु साम्राज्यदिन विविध कार्यक्रमांनी रविवारी साजरा करण्यात आला.
देवरूख येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला २ जून रोजी ३५० वर्षे पूर्ण झाली. शिवरायांच्या गौरवशाली, प्रेरणादायी इतिहासाचा प्रसार व प्रचार करावा या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रथम तालुका संघ चालक चंद्रकांत जोशी व विभाग प्रचारक विवस्वान हेबालकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. सायले येथील प्रथम शिंदे व सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज व अफजलखान भेट यावर पोवाडा सादर करत वाहवा मिळवली.
प्रास्ताविक प्रसाद शिंदे यांनी करताना कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. राजेंद्र राजवाडे यांनी मान्यवर व वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विभाग प्रचारक विवस्वान हेबालकर यांनी हिंदू साम्राज्यदिनाचे महत्व विषद केले. तसेच शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश खामकर यांनी तर आभार तालुका संघचालक चंद्रकांत जोशी यांनी मानले. कार्यक्रमाला शेकडो शंभूप्रेमी उपस्थित होते.