गुहागर-मुंबई एस्टी बसला भोस्ते घाटात ट्रेलरची धडक

प्रवासी थोडक्यात बचावले

खेड (प्रतिनिधी)

मुंबई-गोवा महामार्गावरील ‘ब्लॅकस्पॉट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोस्ते घाटातील अवघड वळणावर अपघात घडला. गुहागरवरून मुंबईकडे जाणाऱ्या एस्टी बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने घासले. यानंतर ट्रेलर घाटातील संरक्षण भिंतीवर जाऊन धडकला. सुदैवाने या अपघातात – एस्टी बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून ट्रेलरचा चालक किरकोळ जखमी झाला .हा अपघात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडला

. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काही काळासाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवावी लागली. अपघात घडल्यानंतर एस्टी बसचे चालक व वाहक यांनी तत्परतेने प्रवाशांची दुसऱ्या बसमध्ये बसवून त्यांना पुढच्या प्रवासासाठी रवाना केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

वारंवार होणारे अपघात आणि प्रशासनाची उदासीनता

भोस्ते घाट हे ठिकाण अनेक वर्षांपासून ब्लॅक स्पॉट म्हणून कुप्रसिद्ध आहे. अवघड वळण, अपूर्ण संरक्षक भिंती, आणि स्पष्ट दिशादर्शक नसल्यामुळे इथे वारंवार अपघात होत असतात. विशेषतः अवजड वाहनांच्या अपघातांची संख्या अधिक आहे. स्थानिक वाहनचालक आणि प्रवाशांच्या वतीने प्रशासनाकडे वारंवार अपघात प्रतिबंधक उपाययोजनांची मागणी होत आहे. मात्र अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. आता पुन्हा एकदा अपघात घडल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.