Demand to file a case against those who post insulting Shivaji Maharaj
पाचल | वार्ताहर : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कोल्हापूर परिसरात वातावरण चिघळलेले असताना राजापूर तालुक्यातील पाचल पंचकोशी या व्हाट्सअप ग्रुपवर एकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी पोस्ट टाकल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संजय नलावडे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली आहे.
पाचल पंचक्रोशी या सुमारे 800 ते 900 ग्रुप मेबंर असलेल्या मोठ्या व्हाट्सअप ग्रुपवर बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अगदी एकेरी भाषेत तसेच त्यांचा अवमान करणारी एक अतिशय संवेदनशिल पोस्ट फॉरवर्ड करण्यात आली आहे. पोस्ट टाकणाऱ्या संबधिताने भावना भडकतील अशा स्वरुपाची पोस्ट शेअर करताना कोणताही मागचा पुढचा विचार केलेला नाही. अशा प्रवृती वाढीस लागता कामा नये यासाठी अशा समाजात वातावरण कलुषित निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर रितसर कायदेशीर कारवाई करुन संबधित ग्रुप ऍडमिन यांनाही तशी समज देणे गरजेचे असल्याचे नलावडे यांनी या निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणाची रितसर चौकशी करून गुन्हा दाखल होऊन कारवाई करावी, अशी मागणी नलावडे यांनी केली आहे.