कणकवली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गडनदी पात्रातील करकीच्या कोंडीमध्ये शिवडाव धरणाचे पाणी दाखल !

 

मान्सून अंदमनातून केरळात दाखल मात्र ; हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात कशामुळे येईना?

कणकवली | मयुर ठाकूर : मागील चार दिवस कणकवली शहराचा ठप्प झालेला पाणी पुरवठा अंशतः सुरू झाला. शिवडाव धरणाचे पाणी बुधवारी रात्री नळ योजनेची पाण्याची विहीर असलेल्या करकीची कोंड या ठिकाणी पोहोचले आहे. त्यानंतर कणकवली नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कणकवली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या भरून गुरुवारी सकाळपासून कणकवली शहरातील बहुतांशी भागाला पाणीपुरवठा सुरळीत केल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.

तर कलमठ येथील पाण्याच्या टाकीवरून शहरातील काही भागांना होणारा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येणार असून तांत्रिक बिघाडामुळे हा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नसल्याचे सांगितले. तरी गुरुवारी दिवसभरात असलेला तांत्रिक बिघाड सुरळीत करून पुढील पाणी पुरवठा सायंकाळपर्यंत सुरळीत केला जाणार असल्याचे सांगितले.

कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेले चार दिवस शिवडाव धरणाचे पाणी गडनदी पात्रात येण्याची प्रतीक्षा केली जात होती. कणकवली शहरवासीयांचे गेले चार दिवस पाण्याविना हाल झाले होते. या स्थितीत काल हे पाणी दाखल झाल्याने शहरातील बहुतांशी भागाला पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला असल्याची माहिती नगरपंचायत कडून देण्यात आली.

जानवली नदीपात्रात पाणी सोडण्याचे आश्वासन हवेत.!

दरम्यान एकीकडे कणकवली नगरपंचायत हद्दीतील नळ योजना अंशतः सुरू झालेली असताना गेले पंधरा दिवसाहून अधिक काळ जानवली नदी पात्रात पाणी सोडले असे सांगणारे प्रशासन याकडे मात्र आजही डोळेझाक करत आहे.

जानवली नदीपात्रालगत सर्वच ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यात असून भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी देखील यापूर्वी अनेकदा लेखी मागणी केली होती. मात्र त्यांना देखील तहसीलदार स्तरावरून पाणी सोडण्याचे सांगितले गेले. तर
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यानी पाणी सोडले आहे लवकरच येईल असे पंधरा दिवसापूर्वी सांगितले. मात्र या नदीपात्रालगतच्या सर्वच नळ योजना सध्या पाण्याअभावी बंद स्थितीत आहेत. त्यामुळे कणकवली शहराच्या पाणी प्रश्नावर प्रशासनाने ताकद लावून तोडगा काढला. मात्र जानवली नदीपात्रात पाणी येण्यासाठी राजकीय इच्छा शक्ती कमी पडते का? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एकीकडे मान्सून अंदमनातून केरळात आला. मात्र हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात कशामुळे येईना? असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.