कोकण कृषी विद्यापीठाच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध-कुलगुरु डॉ. संजय भावे

दापोली | प्रतिनिधी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे नवनियुक्त १६ कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी आज आपल्या कुलगुरु पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी सत्कार समारंभाला उत्तर देताना डॉ. संजय भावे यांनी कोकण कृषि विद्यापीठाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वाच्या सहकार्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती श्री. रमेश बैस यांनी डॉ. संजय भावे यांची कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली. त्यांचा पदभार स्विकारणे व स्वागत समारंभ विद्यापीठाच्या विश्वेश्वरय्या सभागृहात आयोजित करण्यात आला. सुरुवातीला सकाळी ८.३० डॉ. भावे यांनी केळसकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांनी आपल्या कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर विश्वेश्वरय्या सभागृहात स्वागत व समारंभाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमाला दापोली तालुक्यातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून डॉ.संजय भावे यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या., यामध्ये माजी आ. डॉ. चंद्रकांत मोकल, माजी आ. संजय कदम भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, नगराध्यक्ष ममता मोरे यांनी यांना सदिच्छा व शुभेच्छा देऊन विद्यापीठाने पुढील पाच वर्ष घ्यावयाच्या विविध उपक्रमाविषयी आणि कोकणातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काय करता येईल यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ.संजय भावे यांचे पहिले शिक्षक प्राध्यापक जी.ए. सावंत सर यांनी डॉ. भावे यांच्या लहानपणाच्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. यानंतर डॉ.भावे सर आणि स्नेहल भावे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला उत्तर देताना डॉ. संजय भावे यांना हा कार्यक्रम पाहून भारावून जात, कुलगुरू पदाच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव झाली असून आपल्या सर्वांना मिळून काम करावे लागेल, विद्यापीठातील सर्वाधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये प्रामाणिकपणा आणि प्रचंड मेहनत करण्याची वृत्ती असल्यामुळे मला हे काम करणे जड जाणार नाही अशी अशा व्यक्त केली.

यश मिळाले तर ते तुमचे सर्वांचे असेल आणि अपयशाची पूर्ण जबाबदारी स्वतःची असेल असे सांगितले. यावेळी कुलगुरू पदापर्यंत पोहोचण्यामध्ये घरची माणसे, सासरची माणसे आणि मित्रमंडळी यांचे चांगले संस्कार केल्यामुळे आपली चांगली जडणघडण झाली. त्यामुळे त्याचे फलित म्हणून मी या पदापर्यंत पोहोचलो आहे. विद्यापीठातील सर्व अधिकारी कर्मचारी अतिशय मेहनत करणारे असल्यामुळे गेल्या ३३ वर्षाच्या तेथील अनुभवाचा मला नावलौकिक करण्यामध्ये निश्चितच उपयोग होईल अशी ग्वाही दिली. विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर पोहोचवण्याची जबाबदारी आपण सर्व शास्त्रज्ञांची असून आपण निश्चितपणे यामध्ये कुठेही कमी पडणार नाही असेही ते म्हणाले. त्याचबरोबर विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावर मानांकनात पहिल्या दहा मध्ये माझे विद्यापीठ आणण्याचा ही पूर्णपणे प्रयत्न करीन. या कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व संशोधन केंद्राचे प्रमुख, शास्त्रज्ञ तसेच कुलगुरू महोदयांची मित्रमंडळी, दापोलीतील प्रतिष्ठान नागरिक, विद्यार्थी, पत्रकार, विविध मीडिया चॅनलचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. संजय भावे यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्नेहल व्हावे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रमोद सावंत, शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, प्रभारी कुलसचिव डॉ. सतीश नारखेडे, डॉ. विजय नाईक डॉ. पतंगे, डॉ. यशवंत खंडेतोड, डॉ. पी. शिंगारे, डॉ. सी. डी पवार, विद्यापीठ अभियंता श्री निनाद कुलकर्णी, नियंत्रक श्रीमती राजश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीकृष्ण गंगावणे यांनी डॉ. भावे यांच्यावर केलेल्या कविता वाद्यांचा संगतीने सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष वरवडेकर यांनी केले तर आभार प्रभारी कुलसचिव डॉ. सतीश नारखेडे यांनी मानले.