Celebrate all festivals including Bakri Eid in peace
डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने यांची शांतता कमिटीच्या बैठकीत आवाहन
चिपळूण | प्रतिनिधी : कायदा व सुव्यवस्था जपत येत्या बकरी ईदसह विविध सण गुण्यागोविंदाने शांततेत साजरे करा, असे आवाहन चिपळूणचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी (डी.वाय.एस.पी) राजेंद्रकुमार राजमाने यांनी उपस्थित सर्वधर्मिय समाजबांधवांना केले. बकरी ईदच्या पार्श्वभूमिवर गुरुवारी (दि. ८) डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक बोलवली. यावेळी त्यांनी उपस्थितांना विविध कायद्यांविषयी माहिती देतानाच सण, उत्सव साजरे करीत असताना कायद्याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही दिला. मुस्लिम समाजाचे नेते शौकत मुकादम यांनी चिपळूण तालुका शांततेचे प्रतिक असून येथे सर्वधर्मिय विविध सण, उत्सव नेहमी शांततेत पार पाडत असल्याची माहिती दिली व यापुढे देखील सर्व सण कायद्याचे उल्लंघन न करता शांततेत पार पाडून पोलिसांना सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. मुकादम यांनी काही गावांमध्ये मुस्लिम बांधवांच्या घरीदेखिल देवीची पालखी ओटी भरण्यासाठी जात असून हिंदु-मुस्लिम एकत्रित मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा करीत असल्याचे सांगितले. वाढत्या अपघातांचा मुद्दादेखिल यावेळी मुकादम यांनी उपस्थित केला व यावर उपाययोजना करण्याची विनंती पोलीस प्रशासनाला केली. यावर डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने यांनी एखादा अपघात घडल्यास तेथे उपस्थित नागरिकांनी जखमींना तत्काळ दवाखान्यात दाखल करावे, असे सांगताच सहकार्य करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, मुस्लिम सामाज संघटनेचे कार्याध्यक्ष नाझिमभाई अफवारे, युवासेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख निहार कोवळे, श्री. भोसले, चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समिती मुंबई कमिटीचे सरचिटणीस हरिश्चंद्र पवार यांच्यासह विविध गावचे पोलीस पाटील, सरपंच यावेळी उपस्थित होते.