Siren system of Chiplun municipality is quite OK
प्रशासनाने घेतली चाचणी; पंधरा दिवसानंतर पुन्हा तपासणी
चिपळूण | प्रतिनिधी : आपसी व्यवस्थापनांतर्गत शहरात बसविण्यात आलेली सायरन सिस्टीम सुस्थितीत असल्याचे गुरूवारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या तपासणी चाचणीत आढळून आले. पावसाळ्यात ही यंत्रणा व्यवस्थित आहे की नाही हे तपासण्यासाठी पुन्हा पंधरा दिवसानंतर चाचणी घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दि. २२ जुलै २०२१ च्या महापुरामुळे चिपळूण शहरावर मोठी आपत्ती ओढावली होती. निष्पापांचे बळी गेलेच शिवाय न भुतो न भविष्यती अशी आर्थिक हानीही झाली. या आपत्तीत नागरिक, व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले. या भयानक अनुभवातून आज चिपळूण बाजारपेठ व शहर पुन्हा उभे राहिले आहे. महापुरात मदत व बचावकार्य वेळेत पोहोचले नसल्याची गंभीर बाब समोर आली होती. यातून नगर पालिका प्रशासनाने धडा घेत गेली दोन वर्षे आपत्ती व्यवस्थापनाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. पावसाळी अतिवृष्टीत, दरड कोसळल्यास, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास, पूर किंवा महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना वेळीच सतर्क कसे करता येईल आणि भविष्यातील हानी टाळता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच धर्तीवर शहरातील विविध भागात आपत्ती काळात धोक्याचा इशारा देण्यासाठी पब्लिक अॅड्रेस सिस्टीम व सायरन सिस्टीम कार्यान्वित ठेवली आहे. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. यामुळे ही सिस्टीम सुस्थितीत आहे किंवा कसे, त्यात काय बदल करावा लागेल का यासाठी यातील सायरन सिस्टीमची चाचणी घेण्याचा निर्णय नगर पालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे व अधिकारी आणि तज्ज्ञांनी गुरूवारी सायंकाळी चिपळूण नगर पालिका, पेठमाप समाज मंदिर, शंकरवाडी समाज मंदिर, लोटिस्मा, गोवळकोट पाण्याची टाकी व नगर पालिका परिसर येथे सायरन सिस्टीमची चाचणी घेण्यात आली. यावेळी ही यंत्रणा सुस्थितीत असल्याचे आढळून आले. तरीही पावसाळ्यात दर पंधरा दिवसांनी ही यंत्रणा तपासली जाणार आहे