रोणापाल धनगरवाडीत कालव्यात तरुणाचा मृतदेह 

मृत्यूचे कारण अस्पष्ट

बांदा (प्रतिनिधी) : रोणापाल – धनगरवाडी येथे कालव्याच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मंगेश धोंडू कोळापटे (३४, रा. रोणापाल धनगरवाडी) असे त्याचे नाव आहे. कालव्यात तो आंघोळीसाठी उतरला असावा असा अंदाज आहे. मात्र, कालव्यात पाणी कमी असतानाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याबाबत साशंकता आहे.

मंगेश याला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत तो पाण्यात बुडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. कालव्यात कपडे धुण्यासाठी ठेवलेल्या दगडावर त्याचे चप्पल होते. बांदा पोलीस हवालदार टी. टी. कोळेकर, राजेश गवस यांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मंगेशच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनास्थळी रोणापाल ग्रामस्थ मोठ्या संख्येने होते.