पालगड (वार्ताहर) : रविवार दि. ११ जून साने गुरुजी पुण्यतिथीचा कार्यक्रम साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी संचलित पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर पालगड येथील कलामंदिरात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत पद्याने करण्यात आली. त्यानंतर स्वयंम सावंत याने “खरा तो एकची धर्म” हे साने गुरुजींचे गीत पेटीवर सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद दादा केळकर, प्रमुख पाहुणे प्रशाळेचे माजी मुख्याध्यापक विश्वनाथ तांबडे, संचालिका रमा बेलोसे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, विद्यार्थी-पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशाळेतील नुतन मुख्याध्यापक प्रसाद पावशे यांनी कार्यक्रमात साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. साने गुरुजी स्मारकातील प्रतिमेस रमाताई बेलोसे यांच्या हस्ते तर शाळेतील पुतळ्यास माजी मुख्याध्यापक विश्वनाथ तांबडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष शरद दादा केळकर यांनी नुतन मुख्याध्यापक प्रसाद पावशे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका मंजिरी शितूत यांनी उत्कृष्ट केले.