भाजपा महिला मोर्चा मालवण तालुक्याच्या वतीने पोलीस प्रशासनास निवेदन
मालवण | प्रतिनिधी : जितेंद्र आव्हाड यांनी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांची मानहानी आणि बदनामी केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन भाजपा महिला मोर्चा मालवण तालुक्याच्या वतीने मालवण पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंडगे यांना सोमवारी देण्यात आले.
यावेळी भाजप महाराष्ट्र महिला मोर्चा सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य रश्मी लुडबे, भाजप महिला मोर्चा मालवण तालुकाध्यक्ष पुजा करलकर, माजी नगरसेविका पूजा सरकारे, राणी पराडकर, मिलन कांबळी, वंदना चुडनाईक तसेच राजेंद्र लुडबे, गौरव लुडबे आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आम्ही भाजप महिला मोर्चाच्या प्रतिनिधी समाजात महिला सबलीकरण करण्याचे तसेच सामाजिक आर्थिक स्तरावर महिलांना सक्षम करण्याचे काम करतोय. जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे आम्ही आवाज उठवतो. पण सध्या आमच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्र्यहनन करण्याचे प्रकार राष्ट्रवादीचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत. हे पाहता एक महिला म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही.
आव्हाड यांनी ९ जून रोजी रात्री १२ वाजून ५३ मिनिटांनी चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामकारक मजकूर ट्विटवरुन अपलोड केला आहे. चित्रा वाघ यांची मानहानी करण्याचा त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठविण्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उठवले जात आहेत. हे सहन केले जाणार नाही.
म्हणून महिला नेत्या चित्रा वाघ यांची ट्रविटरवरुन बदनामी, मानहानी केल्याप्रकरणी आणि बदनामकारक मजकूर ट्विटरवर टाकल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.