खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील भोस्ते जगबुडी पुलावरून अवजड
वाहतुकीस अटकाव करण्यात आला आहे. तसा
सूचनाफलकही दोन्ही बाजूला लावण्यात आला
आहे. मात्र, तरीही या पुलावरून अवजड
वाहतूक दिवस-रात्र सुरूच असल्याचे निदर्शनास
येत आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने
भोस्ते जगबुडी पुलावरून अवजड वाहतुकीस
सक्त मनाई केली आहे. तरीही वाहने हाकल्यास
यापूढे रिसतर कायदेशीर कारवाई केली जाणार
असून अपघात घडल्यास सर्वस्वी जबाबदारीही
वाहनचालकांचीच राहणार असल्याचा सूचनाफलक पुलानजीक लावण्यात आला आहे.
भोस्ते जगबुडी पूल धोकादायक स्थितीत
असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने यापूर्वीच काढला
आहे. त्यानुसार ३ महिन्यापूर्वी प्रशासनाने भोस्ते
जगबुडी पुलावरून अवजड वाहने हाकण्यास
मज्जाव केला आहे. या पुलाच्या दुरुस्तीचा,
प्रस्ताव लालफितीतच अडकून पडला आहे.
पुलाच्या दुरुस्तीसाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह
स्वयंसेवी संस्था व राजकीय पक्षांनी प्रशासनाकडे
सातत्याने पत्रव्यवहार करूनही अद्याप पुलाच्या
दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्षच दिलेले नाही.
या पुलावरून वाहनांसह पादचाऱ्यांची सतत
रहदारी सुरू असते. रेल्वेस्थानकात ये-जा
करण्यासाठी प्रवाशांसह रिक्षा व्यावसायिकही
याच मार्गाचा वापर करतात. याशिवाय वेरळ,
भोस्ते, कोंडिवली, निळीक, अलसुरे, शिव येथील
ग्रामस्थांना शहरात येण्यासाठी हा पूल सोयीचाच
ठरतो. याशिवाय महामार्गावर दुर्घटना घडल्यास
पर्यायी मार्ग म्हणून भोस्ते पुलाचा वापर
करण्यात येतो. मात्र, भोस्ते जगबुडी पूल
धोकादायक स्थितीत असल्याने अवजड
वाहतुकीस मज्जाव करत प्रशासनाने तसा
सूचनाफलकही यापूर्वीच लावला होता.
सुरूवातीचे काही दिवस या पुलावरून
अवजड वाहतुकीला ब्रेक लागला होता. मात्र,
त्यानंतर पुलावरून अवजड वाहतूक सुरूच
असल्याचे निदर्शनास येत आहे. याशिवाय
वाळूचे डम्परही सकाळच्या सत्रात व रात्री-
अपरात्री वेगात धावत असल्याची बाबही पुढे
आली आहे. पावसाळा काही दिवसांवरच येवून
ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने
सुरक्षिततेच्या दृष्टीने अवजड वाहतुकीस सक्त
मनाई करत तसा सूचनाफलक लावण्यात आला
आहे. या ठिकाणी अपघात घडल्यास सर्वस्वी
जबाबदारी वाहनचालकांचीच राहणार आहे. याशिवाय
रितसर कायदेशीर कारवाईसही समोर जावे लागणार आहे.