खेड(प्रतिनिधी) रत्नागिरी – दादर पॅसेंजर सध्या दिव्यावरून सुटत
आहे. मात्र या ट्रेनचा प्रवास करण्यासाठी पश्चिम उपनगरांत राहणाऱ्या कोकणवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे दिवा- रत्नागिरी
पॅसेंजर रेल्वे गाडीचा विस्तार दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत करण्याची
मागणी रेल्वे प्रवासी संघटनेकडून
करण्यात येत आहे.
ट्रेन क्रमांक ५०१०३/५०१०४ रत्नागिरी – दादर – रत्नागिरी पॅसेंजर ही रेल्वे गाडी रत्नागिरी-दिवा-
रत्नागिरी पॅसेंजरमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने रत्नागिरी – दादर पॅसेंजर गाडी दिव्याला नेऊन त्याच वेळेत दादरहून ०१०२५/०१०२६ दादर – बालिया एक्स्प्रेस (सोमवार,
बुधवार, शुक्रवार) आणि ०१०२७/०१०२८ दादर-गोरखपूर एक्स्प्रेस (रविवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार) या गाड्या सोडल्या. गुजरातमधील वापी,
सुरत, वडोदरा, अहमदाबाद या शहरांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या कोकणवासीयांना पूर्वीच्या रत्नागिरी-दादर पॅसेंजरचा फायदा होत होता. परंतु, आता ही गाडी
दिव्यावरून सुटत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावालागत आहे. त्याच बरोबर मध्य रेल्वेने रत्नागिरी-दादर पॅसेंजरचे दिवा-रोहा मार्गावरील जवळपास ९ थांबे रद्द केले आहेत. यामुळे
केवळ ९-१० मिनिटांची बचत होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पाण्यासाठी अर्धा तास थांबा
पनवेल येथे पाणी भरण्यासाठी दिवा – रत्नागिरी पॅसेंजरला ३० ते ४५ मिनिटे थांबावे लागते. मात्र गाडीच्या सुरुवातीच्या स्थानकातच पाणी भरले
गेले पाहिजे, अशा रेल्वे बोर्डाच्या सूचना असताना या सूचनांना केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे
संघटनांकडून सांगण्यात येत आहे.
गाडीचा विस्तार होणे गरजेचे
प्रत्यक्षात एका थांब्यासाठी ८ – १० मिनिटे गृहित धरल्यास किमान १ तासाची घट अपेक्षित
होती. त्यामुळे मध्य रेल्वेने डाऊन दिशेने जाणारी दादर – रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे गाडीमध्ये दिव्यासाठी
काही अनारक्षित डबे निश्चित आणि लॉक करून ही गाडी दादर किंवा सीएसएमटीपर्यंत वाढवावी.
अक्षय महापदी, रेल्वे अभ्यासक