अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत
माजी नगराध्यक्षांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट
राजापूर | प्रतिनिधी : लांबलेल्या पावसाचा चांगलाच फटका राजापूर शहरवासीयांना बसला आहे. केवळ शिळ जॅकवेलवरच शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असल्याने व त्यातच विजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पाणीसाठयात अडथळा येत असुन शहरात अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
अनेक भागात तीन ते चार दिवसांनी पाणी येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी नगराध्यक्ष ॲड. जमिर खलिफे यांनी मुख्याधिकारी प्रशांत भेसले यांची भेट घेऊन चर्चा केली. यावर उपलब्ध पाणीसाठयातुन शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्याचे शर्थीचे प्रयत्न प्रशासन करत असल्याचे भोसले यांनी सांगितले.
मार्च मध्येच कोदवली धरणातील पाणीसाठा संपल्याने आता केवळ शिळ जॅकवेलकडूनच राजापूर शहराला पाणीपुरवठा होत आहे. कोदवली धरणातील गाळ काढल्यानंतर आता धरणात पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र ते पाणी गढूळ असल्याने सध्या साठवण टाकीत आणणे शक्य नाही. त्यामुळे शिळकडूनच सध्या शहराला पाणीपुरवठा होत आहे. मात्र त्यातही विजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पाणीसाठा होण्यास व्यत्यत येत असून त्याचा परिणाम पाणी वितरणावर होत आहे. सध्या शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून काही भागात तर तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. तर काही भागात रात्री कधीही पाणी येत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी नगराध्यक्ष ॲड. जमिर खलिफे यांनी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची भेट घेतली व याबाबत चर्चा केली. यावर मुख्याधिकारी भोसले यांनी शहरवासीयांना उपलब्ध पाणीसाठयातुन पाणीपुरठा करण्याचाआंम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असून पाऊस लांबल्याने टंचाईची तीव्रता अधिक झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ॲड. खलिफे यांनी पावसाळयापुर्वी शहरातील सर्व पथदीप सुरळीत सुरू ठेवावेत अशीही मागणी केली. त्यावर काम सुरू असल्याचे भोसले यांनी सांगितले.
उपलब्ध पाणीसाठयातुन पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न –प्रशांत भोसले
शहराला नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाणीसाठा संपला आहे. मात्र नाम फाऊंडेशनच्या सहकार्यातुन या धरणातील गाळ उपसण्यात आल्याने पुढील वर्षी या धरणात मुबलक पाणीसाठा झालेला असेल. नवीन धरणाचे कामही अद्याप अपुर्ण आहे. त्यामुळे सध्या केवळ शिळ जॅकवेलकडूनच शहराला पाणीपुरवठा होत असून विज पुरवठा खंडीत झाल्यावर त्यातही व्यत्यय येत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठयातुन शहरात पाणीपुरवठा करण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहेत. त्यातच पाऊस लांबल्याने पाणीटंचाईची झळ आणखीनच वाढली आहे. मात्र नागरिकांनी आजपर्यंत चांगले सहकार्य केले असून यापुढेही करावे असे आवाहन भोसले यांनी केले आहे.
ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये भिषण पाणीटंचाई
लांबलेल्या पावसाचा जसा राजापूर शहराला फटका बसला आहे तसाच फटका ग्रामीण भागातील जनेतला बसला आहे. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठयाचे स्त्रोत आटू लागल्याने जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक भागातील विहीरी, झरे आटल्याने नळपाणीपुरवठा योजनांनाही बंद पडल्या आहेत. त्यामुळे दीड ते दोन किलोमिटर पायपीट करत महीलांना पाणी आणावे लागत आहे.












