लांजा शहरासह तालुक्यात पावसाचे दमदार आगमन
शनिवारी सकाळपासून मुसळधारपणे पडण्यास पावसाला सुरुवात
लांजा (प्रतिनिधी) शनिवारी सकाळपासूनच लांजा शहरासह तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे . त्यामुळे तालुका वासियांची प्रतीक्षा अखेर संपली असून पावसाच्या आगमनाने बळीराजा देखील सुखावून गेला आहे.
यावर्षी जून महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाची हजेरी लांबच चालण्याचे चित्र दिसून येत होते. त्यानंतर पावसाचे आगमन होत नसल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली होती तर शेतकरी वर्ग देखील पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसला होता. पावसाअभावी तालुक्यातील शेतीची कामे देखील खोळंबली होती. तर ज्या ज्या भागात पेरणी करण्यात आली होती त्या शेतकऱ्यांवर पाऊस पडत नसल्याने दुबार पेरणीची वेळ येऊन ठेपली होती.
जून महिन्याचा शेवटचा आठवडा संपत आला तरी पावसाचे चिन्ह नसल्याने तालुका वासीय आणि शेतकरी वर्ग पुरते हैराण झाले होते. त्यामुळे प्रत्येक जण पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होता आणि अखेर ही प्रतीक्षा संपली असून शनिवारी सकाळपासूनच लांजा शहरासह तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधारपणे पडणाऱ्या या पावसाच्या आगमनामुळे सर्वजण सुखावून गेले आहेत.