▫️रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर साखरपा गावानजीक मेढे गावालगत असलेली एक मोरी काल अचानक खचली. सध्या सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरणात ह्या मोरीचे काम सुरू असतानाच ह्या मोरीची दुरावस्था झाली. परिणामी महामार्गावरील दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर ह्याचा मोठा परिणाम दिसून आला.
▫️दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल दोन तास थांबवण्यात आली आणि मोरीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
दरम्यान मेढेहून दाभोळ्याच्या दिशेने दीड किलोमीटर तर साखरप्याच्या दिशेने वाहनांची तितकीच मोठी रांग लागली. काही वाहनचालकांनी दाभोळे, कनकाडी, वांझोळे मार्गे साखरपा गावात येणे पसंत केले.
मोरीच्या कामाला एक जेसीबी, एक पोकलेन मशीन आणि दोन डंपर तातडीने लावण्यात आले. वाहतूक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तासांच्या कामानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण सतत पडत असलेल्या पावसामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरलेले पाहावयास मिळत होते.