मंडणगड – प्रतिनिधी
सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात राजश्री शाहू महाराज यांची 149 वी जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम माननीय मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा पाटील मॅडम, उप मुख्याध्यापक श्री .अर्जुन हुल्लोळी सर, पर्यवेक्षक श्री. शांताराम बैकर सर शिक्षक प्रतिनिधी सौ. स्वरा देवघरकर मॅडम या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा पाटील मॅडम यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर विद्यार्थिनी कुमारी श्रीप्रिया केंद्रे हिने शाहू महाराजांविषयी आपले मत मांडले. त्यानंतर विद्यालयातील शिक्षक , साहित्यिक श्री.किशोर कासारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजर्षी या शब्दाचा अर्थ सांगितला, राजांमधील ऋषी असं शाहू महाराजांचे जीवन आहे. त्यांनी कला, क्रीडा ,शिक्षण ,शेती ,सहकार या क्षेत्रात कार्य केल्याचं सांगितलं .डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांना लोकशाहीचे आधारस्तंभ म्हटलेले आहे. शाहू महाराज हे कुशल रत्नपारखे होते. त्यांनी बहुजन समाजातील अनेक तरुणांना शिक्षण देऊन समाजकार्यासाठी तयार केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मूकनायक या मासिकासाठी त्याकाळी अडीच हजार रुपयांचे अनुदान दिले होते. ते असे पहिले राजे होते की, ज्यांनी महाराष्ट्रात गाव तेथे शाळा हे धोरण राबवले आणि आपल्या अर्थसंकल्पात 23 % तरतूद शिक्षणासाठी केली. 1902 मध्ये त्यांनी शिक्षणाचे सार्वत्रिकरण व मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा विचार राबवला. शाहू महाराज हे दूरदृष्टीने विचार करणारे होते. खेड्यांचा विकास झाला तर शहरांकडे जाणाऱ्या लोकांचा लोंढा थांबू शकेल. हा विचार करून त्यांनी राधानगरी धरणासारखा महत्वकांक्षी उपक्रम राबवला. त्यांनी शिक्षणाला एक नवीन दर्जा, नवीन दृष्टी आणि शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्याय सामान्य लोकांमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला.
आज विद्यालयात त्यांची 149 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाकडून राबवण्यात आला होता. सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख श्री. संजय अवेरे सर यांनी प्रास्ताविक केले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.