राजापूर | प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम आपल्याला घराघरात पोहचवून सन 2024 मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात आपल्या कमळ निशाणीवर हक्काचा खासदार निवडून आणावयाचा आहे. त्यामुळे आजच निर्धार करा आणि कामाला लागा व विकासाच्या आड येणारी काळी मांजर निष्क्रिय खासदार विनायक राऊत याचे पार्सल सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेसने वाकोल्याला पाठवा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामातुन भारताचे जगात वजन आणि वलय निर्माण झाले आहे. हे काम आपल्याला घराघरात पोहचवायचे आहे हे लक्षात ठेवा असेही राणे यांनी यावेळी सांगितले.
आपल्या भाषणात राणे यांनी ठाकरे, राऊत यांचा खरपूस समाचार घेतला.
पतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या माध्यमातुन होत असलेला विकास आणि योजना, राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचे काम आपण सगळयांनी जनतेपर्यंत पोहचवायचे आहे. यावेळी काहीही झाले तरी 2024 ला आपल्या हक्काचा आपला खासदार आपल्याला निवडून आणायचा आहे. मातोश्रीवर वही पेन उचलत रहाणारा, हुजरेगिरी करणारा आणि मतदार संघातील जनतेला विकासापासून वंचित ठेवणारा खासदार आपल्याला नको आहे. कायमच विकासाच्या आड येणारी ही काळी मांजर म्हणजे विनायक राऊत असून हे पार्सल बॅग घेऊन आता सुपरफास्ट वंदे भारतने वाकोल्याला पाठवायचे आहे हे लक्षात घेऊन कामाला लागा असा आदेश राणे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने केलेली प्रगती गौरवास्पद आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह रोजगार क्षेत्रात आपला देश प्रगती साधत आहे. मात्र केवळ टिका करण्याचा एककलमी कार्यक्रम असलेल्या विरोधकांना हे काम दिसत नाही, लायकी नसणारे लोक आज टिका करत आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवानह राणे यांनी केले.
विनायक राऊत यांनी त्यांनी केलेली दहा विकास कामे दाखवावीत आपले उघड आव्हान आहे त्यांना असे सांगतानाच किती रोजगार दिले, किती विकासाचे प्रकल्प आणले हे एकदा सांगा असे आव्हानही राणे यांनी यावेळी दिले.
पाटण्यात मोदींच्या विरोधात एकत्र आलेले सगळे हे कालबाहय झालेले सगळे थकलेले लोक आहेत. ते कधीच मोदींना कधीच हरवु शकत नाहीत. ज्यांना स्वताचे अस्तीत्व नाही अशी मंडळी एकत्र येऊन काय करणार असा सवालही राणे यांनी उपस्थित केला आहे.
राजापूरचे आमदार राजन साळवी यांची पक्षात सध्या अत्यंत बिकट अवस्था आहे. त्यांना पक्षातच कोण विचारत नाही, त्यामुळे काय करायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे अशी टीकाही राणे यांनी केली.