पाटपन्हाळे महाविद्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा

पाटपन्हाळे (वार्ताहर) गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने ‘सामाजिक न्याय दिवस’ साजरा करण्यात आला.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. शिक्षण, आरक्षण, समता आणि बंधुता या मार्गांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचा पाया घालण्याचे कार्य केले हि गोष्ट त्याकाळात क्रांतिकारक होती. त्यांच्या विचारांचा वारसा आजही समाजाने जोपासणे गरजेचे आहे आणि विशेष करून विद्यार्थ्यांनी या गोष्टी आपल्यात रुजविल्या तरच शाहू महाराजांना ती न्याय्य आदरांजली ठरेल असे विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना कला शाखा प्रमुख प्रा. प्रमोद देसाई म्हणाले की, आजच्या राजकीय जीवनात सुरु असलेली कट्टरता पाहता शाहू महाराजांचे विचार किती काल सुसंगत होते हे दिसून येते. राजर्षी शाहू महाराज हे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जोडणारे दुवा होते. आजच्या समाजाने या महान नेत्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. त्याशिवाय समाजात खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे वातावरण निर्माण होणार नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पुरोगामी विचार टिकून आहेत त्याला छत्रपतींचे कार्य कारणीभूत आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे व तसे आचरण केले पाहिजे असे आवाहन केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील डॉ. सुभाष खोत, डॉ. दिनेश पारखे, ग्रंथपाल धनंजय गुरव आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रसाद भागवत यांनी केले तर डॉ. प्रवीण सनये यांनी आभार मानले.