काडवली ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सुनावले
चिपळूण (प्रतिनिधी): आम्हाला धरण हवे आहे. मात्र, सरसकट शेतकऱ्यांना विश्वासात घ्या. शेतकऱ्यांच्या शकांचं निरसन होत नाही. तसेच धरणाचे काम सुरू असलेल्या काही अंतरावरच क्रशर खाण सुरू आहे. या क्रशरमुळे धरणाला धोका होऊ शकतो. तरी या क्रशरच्या बंदचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धरणाच्या कामाला सुरुवात करू नये, अशी मागणी काडवली (ता. खेड) येथील ग्रामस्थांनी धरण व निगडित प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत पाचघरवाडीमधील श्रीराम मंदिरात शनिवारी झालेल्या बैठकीत केली. यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला.
काडवली (ता. खेड) येथे धरण मंजूर झाले असून कामाला देखील सुरुवात झाली आहे. दरम्यान, ५ मे रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली होती. मात्र, काही शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन झाले नव्हते. यामुळे पुन्हा बैठक व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली. यातून नुकतीच बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी महाडिक हे होते.
यावेळी ग्रामस्थ- धरणग्रस्तांनी अनेक प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. यावेळी अनेक धरणग्रस्त शेतकऱ्यांना नोटीसा पोहोचल्याच नसल्याचे समोर आले. ठेकेदाराने विश्वासात न घेता रस्ता केल्याचा मुद्दा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला. या दोन्ही मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली. याबाबत अधिकारी व ठेकेदार या दोघांना जाब विचारण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी काही धरणग्रस्त शेतकऱ्यांना नोटीसा न पोहोचल्याबाबत चूक मान्य केली.
तसेच तात्पुरते स्थलांतर अथवा विस्थापनबाबत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला. यावर जलसंधारण विभागाचे वैभव पाटील यांनी या धरणाला पुनवर्सन कायदा लागू होत नाही. यामुळे विस्थापनाचा प्रश्न येत नाही. तसेच तात्पुरते स्थलांतर होणार नाही, असे सांगितले. यावर ग्रामस्थांनी आम्हाला लेखी द्या, असे सांगितले. तसेच आमचं विस्थापन होणार असेल तर आम्हाला धरण नको, अशा शब्दांत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना खडसावले. आमचं आयुष्य पणाला लागलं आहे आणि तुम्ही आम्हाला विश्वासात घेत नाही. याबाबत नाराजी व्यक्त करताना सरसकट शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, असे सांगितले. तसेच धरणाची उंची कमी करण्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. तसेच भु संपादीत जमिनीसंदर्भात माहिती देतांना गट नंबर, संपादित क्षेत्र व शेतकऱ्याचे नाव अशी संक्षिप्त टिपणी सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांसमवेतच्या मिटिंग संदर्भात किमान १५ दिवसांचा कालावधी मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे केली.
भूसंपादन प्रक्रिया, फळबाग व वन झाडे मोजणी प्रक्रिया कुठपर्यंत झाली आहे? याची विचारणा ग्रामस्थांनी केली. यावर अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मात्र, पुढील मिटिंगवेळी सर्व कागदोपत्री माहिती आणावी,असे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
धरणाचे काम सुरू असलेल्या काही अंतरावर क्रशर खाण सुरू आहे. या क्रशरमुळे परिसरातील घरांना तडे गेले आहेत. ही बाब वेळोवेळी प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. घरांना तडे जात असतील तर धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब मागील बैठकीवेळी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली गेली. जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली. यासंदर्भातील अहवालाची मागणी करण्यात आली होती. मात्र, या अधिकाऱ्यांनी अहवाल दिलेला नसल्याचे या बैठकीत समोर आले. तरी याबाबत पाठपुरावा व जलसंधारण विभागाला तसे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. या क्रशर खाणीमुळे धरणाला धोका होऊ शकतो. तरी या क्रशरच्या बंदचा निर्णय होत नाही. तोपर्यंत धरणाचे काम सुरू करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
प्रतिष्ठित ग्रामस्थ संभाजी महाडिक यांनी अधिकाऱ्यांना प्रवाहाबरोबर राहण्याचा सल्ला दिला. धरणाबाबत आम्ही सकारात्मक आहोत. मात्र, आम्हाला गृहीत धरून नव्हे, असे स्पष्ट पणे सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा लांबे, उपसरपंच रोहित आग्रे, सदस्या सौ. मानसी महाडिक, सौ. प्रतिभा जाधव, माजी उपसरपंच राकेश महाडिक, सदस्य सुधाकर चव्हाण, विजय गजमल, माजी सदस्य मनोज काजवे, माजी पोलीस पाटील संभाजी महाडिक, राजेंद्र महाडिक, माजी सैनिक अनंत महाडिक, विनायक महाडिक, शांताराम महाडिक, दिगंबर महाडिक, जगदीश महाडिक, महेश महाडिक, रुपेश महाडिक, संकेत सावंत, माजी सरपंच जगदीप महाडिक, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश महाडिक, बाजीराव महाडिक, सुनील महाडिक, सुरेश कृष्णाजी महाडिक, सतीश बाबुराव महाडिक, अंकुश जाधव, मोहन जाधव, विजय राणे, सुभाष हुमणे, नारायण गजमल, प्रशांत महाडिक, वसंत पड्याळ, वसंत खाडे, रवींद्र खाडे, लक्ष्मण खाडे, संदेश खाडे, सुनील कांगणे, गणेश महाडिक, संतोष सावर्डेकर, महेश काजवे, परशुराम जाधव तसेच खेड प्रांत कार्यालयातील अशोक खेतले, वनरक्षक अशोक ढाकणे, श्री. भाटकर तसेच मुंबई, पुणे, नाशिक येथे नोकरीनिमित्त असणारे चाकरमानी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.