कोरोना केंद्र गैरव्यवहाराप्रकरणी युवासेना पदाधिकारी सूरज चव्हाणची ED तर्फे सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी 

 

मुंबई : कोरोना केंद्र गैरव्यवहाराप्रकरणी युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांची ED तर्फे सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. या प्रकरणी ईडीने चव्हाण यांना समन्स बजावून सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. चव्हाण हे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ईडीच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात दाखल झाले. चव्हाण यांनी अनेक कंत्राटदारांना कंत्राटे मिळवून दिल्याचा आरोप आहे. शिवाय त्यांनी चढय़ा भावाने कंत्राट मिळवून दिल्याचाही त्यांच्यावर आरोप असून हे त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून केले? तसेच या प्रकरणी चव्हाण यांना किती आणि कसा नफा झाला, याची चौकशी ईडीतर्फे केली जात आहे.

 

खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय व्यावसायिक सुजीत पाटकर यांच्याविरोधात कोरोना केंद्र कंत्राट घोटाळय़ाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराची ईडी चौकशी करत असून त्याचाच भाग म्हणून २१ जून रोजी ईडीने मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले होते. त्यात चव्हाण यांच्या निवासस्थानासह महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या आणि प्रशासकीय अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या मालमत्तांचा समावेश होता.