रत्नागिरी : मान्सून लवकरच येतो आहे म्हणून सर्वांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. पाऊस किनारपट्टीच्या गावांना जास्त प्रमाणात पडतो आणि साथरोगांना कारणीभूत ठरतो. पावसाळयात दुषित पाणी वाहुन आल्यामुळे ग्रामीण व शहरी भागात साथरोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर पहायला मिळतो. त्याचप्रमाणे नदी काठचे गावांमध्ये काविळ, हगवण, अतिसार, लेप्टोस्पायरोसीस, माकड ताप तर शहरी भागात डेंगू अशा विविध आजाराच्या साथी पावसाळयात पसरतात. अशा वेळी पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून वितरीत होणाऱ्या पिण्याच्या पाण्यावर योग्य शुध्दीकरण प्रक्रिया करणे आवश्यक असून पावसाळयात पाणी उकळून व गार करुन पिणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतस्तरावर पुरेसा TCL साठा उपलब्ध ठेऊन त्यामधील उपलब्ध क्लोरीनचे प्रमाण कमी होऊ नये याकरिता TCL साठवणूक काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर पाणी पुरवठा करणारे कर्मचारी व जलसुरक्षक यांचे उजळणी प्रशिक्षण घेण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. ग्रामपंचायतस्तरावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करुन, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे माहे एप्रिल 2023 मध्ये स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने आपआपल्या कार्यक्षेत्रात जलजन्य तसेच किटकजन्य आजाराच्या प्रभावी नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
कोणत्याही प्रकारच्या साथरोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याची माहिती तात्काळ जिल्हा साथरोग नियंत्रण कक्षाला देण्याबाबत आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी व इतर संबंधितांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर साथरोग औषध किट अद्ययावत करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. गृहभेटीमध्ये आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेवक यांचेमार्फत साथरोगाबाबत, दुषीत पाणी पुरवठा होणाऱ्या समस्यांबाबत पुरेशी जनजागृती केल्यास या उपायांची अंमलबजावणी करणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांना जनतेकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो.
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टी व वादळाचे इशाऱ्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हास्तरावरुन देण्यात येत आहे. पावसाळयामध्ये नदीकाठचे व पाणी भरणारी (पाण्याचा विसर्ग न होणारी) गावे निश्चित करुन, त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. साथरोग प्रतिबंध व नियंत्रणाचे काम अधिक नेमकेपणाने तसेच मनुष्यबळ व साधन सामुग्रीचा सुयोग्य नियोजनाने साध्य करण्याकरिता प्रत्येक तालुक्याने आपआपल्या भागातील जोखिमग्रस्त गावांची यादी तयार करून, जोखिमग्रस्त गावांची निवड करणे आवश्यक आहे. यामध्ये 1) मागील तीन वर्षात किटकजन्य व जलजन्य आजारांचा उद्रेक झालेली गावे, 2) नदीकाठावरील गावे, तसेच पूर्वीची पूरग्रस्त गावे, 3) स्वच्छता सर्वेक्षणात लाल कार्ड देण्यात आलेली गावे व 4) पाणी टंचाई असणारी गावे 5) आश्रमशाळा विद्यार्थी वसतिगृह वृध्दाश्रम या जोखीमग्रस्त गावांकरिता स्थानिक आवश्यकतेनुसार विशेष कार्ययोजना आखणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याकडील मर्यादीत संसाधने अधिक परिणामकारकरित्या वापरणे शक्य होईल.
डासोत्पत्ती रोखण्यासाठी एकात्मिक किटक व्यवस्थापन ही संकल्पना व्यवहारात राबविणे आवश्यक आहे. याकरीता स्थानिक गरजानुसार विशेष भर देण्यात यावा. गावपातळीवर होणारे संशयित साथरोग उद्रेक, साथरोग उद्रेकाचे सतर्कतेचे इशारे वेळीच लक्षात आणून देणे गरजेचे आहे. साथरोग नियंत्रणासाठी पाणी पुरवठा व ग्रामविकास, कृषी, नगर विकास आणि पशुसंवर्धन अशा विविध विभागांनी नियमित समन्वय ठेवावा. आपल्या कार्यक्षेत्रातील नगर परिषद कार्यक्षेत्रातही साथरोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आली आहे याची खात्री करावी. साथरोग नियंत्रणाच्या पूर्वतयारीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व ग्राम आरोग्य व स्वच्छता व पोषण समितीच्या बैठका माहे जून व जुलै या दोन महिन्यात घेण्यात याव्यात. या बैठकांमध्ये गावातील साथरोग विषयक समस्यांचा सांगोपांग विचार करण्यात येऊन त्यानुसार योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक तो लोक सहभागही या माध्यमातून मिळवावा. आपापल्या कार्यक्षेत्रातील साथरोग परिस्थितीचे अवलोकन करून आपल्या भागातील जनतेस साथरोग प्रतिबंधासाठी कोणते संदेश देणे महत्वाचे आहे हे निश्चित करण्यात यावे. त्यानुसार विविध माध्यमाद्वारे जनतेचे आरोग्य विषयक प्रबोधन करावे असे आवाहन जिल्हा परिषद रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी केले आहे.