रत्नागिरीत २९ जूनला निघणार आषाढ वारी

 

पारंपरिक वेशभूषा, टाळ- मृदुंग, पताकांसह सहभागी होण्याचे आवाहन

रत्नागिरी |प्रतिनिधी : अनेक वर्षे वारीमध्ये सहभागी होणाऱ्या व काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपूरला वारीत जाणे शक्य नसल्याने मागील वर्षापासून रत्नागिरीमध्ये आषाढी वारीचे आयोजन करण्यात आली. याही वर्षी आषाढी एकादशीला २९ जून रोजी आषाढ वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारीचा मार्ग मारुती मंदीर ते विठ्ठल मंदीर असा असून वारीची सुरवात सकाळी ७ वाजता होईल. वारकरी, भाविकांनी बहुसंख्येने पारंपरिक वेशात, टाळ- मृदुंग, पताकांसह सहभागी होत वारीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आषाढ वारी आयोजकांनी केले आहे.
वारी… म्हणजे सामाजिक सलोखा आणि बंधुभाव याचा अध्यात्मिक वाटेवरील पुरातन काळापासून सुरू असलेला सोहळा. दरवर्षी आषाढी एकादशीला टाळ मृदुंगाच्या आणि हरी नामाच्या गजरात हजारो वारकरी आपापल्या ठिकाणाहून पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरीला येतात, आपापली सुख दुःख पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतात आणि पांडुरंगाचा आशिर्वाद घेऊन आपापल्या ठिकाणी परत जातात. पांडुरंगाच्या ओढीने पंढरीच्या वाटेवर वारीतून मजल दर मजल करत जाताना वारकरी बांधवाना आपली संस्कृती, संतानी केलेले कार्य याचीच फक्त ओळख होते असं नाही, तर नकळत वारीमध्ये सोबत चालणाऱ्या व्यक्तींसोबत सामाजिक सलोख व बंधुभाव याच नातंही आपोआप तयार होत असत.
पंढरीच्या वारीत इच्छा असूनही सहभागी होणे सर्वानाच शक्य होते असं नाही. म्हणूनच गेल्यावर्षी रत्नागिरीमध्ये आषाढवारीचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरीचे शक्तीमंदिर म्हणजेच मारुती मंदिर येथे एकत्र आलेल्या हजारो भाविकांची दिंडी प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगाच्या भेटीला गेली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले भाविक, खांद्यावर पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन, जोडीला टाळ मृदुंगाच्या साथीने सुरू असलेला विठूनामाचा गजर यामुळे अवघे वातावरण विठ्ठलमय झाले होते. याच निमित्ताने सहभागी भाविकांना वारीची अनुभूती आली व आनंदही मिळाला होता. याही वर्षी हजारो वारकरी, भाविक वारीत सहभागी होणार आहेत.