कोकण आणि गोवा राज्यात पर्यटनाला चालना देणारी वंदेभारत एक्सप्रेस : बांधकाममंत्री ना. रविंद्र चव्हाण

संतोष वायंगणकर

मडगाव येथून निघणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा हा पहिला प्रवास आहे. गोवा राज्यातून निघणारी ही वंदे भारत एक्सप्रेस कोकण आणि गोवा राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देणारी ठरेल. या एक्सप्रेसच्या माध्यमातून पर्यटकांची कोकणात येणारी संख्या वाढेल. यातून कोकणात पर्यटनवाढीतून आर्थिक समृद्धी येईल असे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी दै. प्रहार व प्रहार डिजीटलशी बोलताना सांगितले.
वंदे भारत एक्सप्रेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथून हिरवा बावटा दाखविल्यानंतर ही वंदेभारत एक्सप्रेस मडगाव येथून मुंबईकडे रवाना झाली. पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी वंदेभारत एक्सप्रेसमधून मडगाव ते मुंबई दरम्यान प्रवास केला. या रेल्वे प्रवासात पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता ना. चव्हाण म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील तिर्थस्थान आणि पर्यटनस्थळ यांना चालना देण्यासाठी वंदेभारत एक्सप्रेसला जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून राज्या-राज्यातील विविध पर्यटन स्थळ जोडली जाणार आहेत. मुंबई, कोकण आणि गोवा राज्य या वंदेभारत एक्सप्रेसने जोडले गेले आहे. या वंदेभारत एक्सप्रेसच्या माध्यमातून मुंबई ते गोवा व्हाया कोकण राज्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशी पर्यटकांना निश्चितच पर्यटनाला वारंवार कोकणात येण्याची भुरळ पडेल.
वंदेभारत एक्सप्रेसमधील हा प्रवास कसा वाटतोय असे विचारता सार्वजनिक बांधकाममंत्री ना.रविंद्र चव्हाण म्हणाले अहो खर सांगायच तर मुंबईतून कोकणचा रेल्वे प्रवास हा खुप वेगळा आनंददायी आहे. याचा अनुभव कोकणात रेल्वे प्रवास करणारे सारेच घेतात. मात्र, कोकणातील निसर्ग सौंदर्य पहात आल्हाददायक वातावरणात होणारा हा प्रवास निश्चितच सर्वांनाच आवडेल. या प्रवासात कोकणातील सौंदर्य पहात हा प्रवास अधिक निश्चितच पर्यटकांना आनंद देणारा ठरेल. वंदेभारत एक्सप्रेस कोकणवासियांना अभिमान वाटावा अशी एक्सप्रेस रेल्वे आहे. ना.रविंद्र चव्हाण म्हणाले, आपल्या कोकणसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदेभारत एक्सप्रेसची दिलेली ही मोठी भेट आहे. येणाऱ्या काळात कोकण रेल्वे मार्गावरही डबल ट्रॅक टाकला जाईल यात संदेह नाही. जर कोकण रेल्वे मार्गावर डबल ट्रॅक झाला तर निश्चितच कोकण ते मुंबई हे अंतर अवघ्या चार तासावर येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल असा विश्वास ना.चव्हाण यांनी व्यक्त केला.