सरपंच स्नेहल जामदार यांच्या नेतृत्वाखाली साफसफाई
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी रेडी राज्य मार्गावरील मळगांव घाटीतून ये-जा करणारे वाहनधारक, पर्यटक व विक्रेते यांच्याकडून टाकल्या जाणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्यामुळे मळगांव घाटीला डंपिंग ग्राऊंडचे स्वरूप प्राप्त झाले होते. ओल्या कचऱ्यासहित प्लास्टिक पिशव्या,मिनरल वाॅटर व कोल्ड्रिंकच्या बाॅटल्स, पाणी व अन्य पदार्थांचे बाॅक्स, थर्माकोल आदी कचऱ्याचा जागोजागी ढिग जमा झाल्याचे चित्र दिसत होते. या पार्श्वभूमीवर मळगांव सरपंच स्नेहल जामदार यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मळगांव घाटी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या स्वच्छता अभियानात ग्रामस्थ तुळशीदास नाईक,केतन नार्वेकर, संतोष नार्वेकर, उदय जामदार, विश्वनाथ गोसावी, निलेश चव्हाण, सिद्धेश फेंद्रे, राजाराम शिरोडकर, प्रसाद नार्वेकर, समीर परब, अथर्व धुरी , निलेश नाटेकर, आर्यन लोके, प्रथमेश खडपकर, मनिष नाटेकर, उदय फेंद्रे, राजा नाटेकर, शेखर राऊळ व प्रसाद लुमाजी आदींनी सहभाग घेतला.
या मळगांव घाटी स्वच्छता अभियानांतर्गत श्री देव भुतनाथ जगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या साफसफाई बाबत मळगांव ग्रामस्थांसहित मळगांव घाटीतून ये जा करणारे प्रवाशी,वाहन चालक, पादचारी यांच्याकडून कौतुक करण्यात आले.
मळगांव घाटीच्या सुरुवातीला श्री देव भूतनाथ मंदिर प्रवेशद्वार ते घाटातील धबधबा पर्यंत साफसफाई करण्यात आली.तर जमा झालेला कचरा एकत्रित करुन तो सर्व कचरा मळगांव मधील ग्रामस्थ तथा बांधकाम व्यावसायिक उदय जामदार यांनी उपलब्ध करुन दिलेल्या टेम्पो मधून एकत्रित करून वस्तीपासून दूर नेऊन त्याचे विघटन करण्यात आले.
Sindhudurg