रायगड Update : आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने ताम्हेणी घाटातून वळवली वाहतूक

रायगड : मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा आंबेनळी घाटात सुरू असलेल्या काल मंगळवारी रात्री दरड कोसळली. या मुळे या घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.

दरडीमुळे रस्त्याचा एक भाग खचून दरीत पडला आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सध्या दरड हटवण्याचे काम सुरू आहे.

आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील महत्वाचा घाट आहे. घाटात वाहनांची नेहमी वर्दळ असते. हा घाट पोलादपूर पासून ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या मार्गावर आहे. तब्बल ४० कि.मी. लांबीचा हा घाट आहे. महाबळेश्वर परिसरात तसेच या घाटात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.

हवामान विभागाने घाटात दरड कोसळण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास एक मोठी दरड घाटात कोसळली. यामुळे येथील रस्ता देखील खचला आहे. , या घटनेत जीवित हानी झाली की नाही याची माहिती मिळू शकली नाही. घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच दरड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

महाबळेश्वर ते पोलादपूरमध्ये दोन घाट आहेत ‘फिट्झेराल्ड’ हा महाबळेश्वर ते वाडा कुंभरोशीपर्यंत आहे. तर, दुसरा ‘आंबेनळी’ हा कुंभरोशी ते पोलादपूरपर्यंत आहे. जावळीच्या घनदाट अरण्यात हा घाट येतो.

दरम्यान पोलादपूर कडुन महाबळेश्वर कडे जाणारा आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंट जवळ दरड कोसळली असल्याने आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. प्रवाशांनी ताम्हेणी घाटातून जाणाऱ्या मर्गाचा अवलंब करावा. असे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कळवले आहे.