रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्सच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ‘भक्तिरंग’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवारी (ता. २९) सायंकाळी पाच वाजता जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर वसतिगृहाच्या सभागृहात होणारी ही मैफल सांगलीचे अभिषेक काळे आणि ठाण्याच्या सृष्टी कुलकर्णी हे गायक रंगवणार आहेत. त्यांना निखिल रानडे (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज), निरंजन गोडबोले (संवादिनी), संतोष आठवले (ऑर्गन) आणि सुहास सोहनी (तालवाद्य) हे संगीतसाथ करणार असून वामन जोग हे निवेदन करतील.
गायक अभिषेक काळे यांनी ८ वर्षे पं. जयतिर्थ मेहुंडी यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे मार्गदर्शन घेतले असून सध्या ते सांगलीचे पं. शरद बापट यांच्याकडून गायनाची तालीम घेत आहेत. आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. गंगूबाई हनगल फाउंडेशन (हुबळी-कर्नाटक) तर्फे त्यांना गौरवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांना नॅशनल अॅवॉर्ड मिळाले आहे. मंदारमाला, बिलासखानी तोडी, संशयकल्लोळ, मेघमल्हार आदी संगीत नाटकांतूनही त्यांनी उत्कृष्ट गायक नटाची भूमिका करून राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले आहेत. म्हैसूर, बेळगाव, पुणे, नांदेड, मिरज, ग्वाल्हेर, सिंगापूर इ. ठिकाणच्या नामवंत संगीत महोत्सवात त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. संगीतकार अशोक पत्की, मंगेश पाडगावकर, पद्मश्री पद्मजा फेणाणी -जोगळेकर आदी मान्यवरांसोबत त्यांनी गायनाचे कार्यक्रम सादर केले आहे. विदुषी गंगुबाई हनगल, बालगंधर्व युवा, कुमार गंधर्व, जयवंत कुलकर्णी, संगीत भास्कर, इंदिराबाई खाडीलकर पुरस्काराने ते सन्मानित आहे. त्यांनी भूमिका केलेल्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाले आहेत.
गायिका सृष्टी कुलकर्णी ८ वर्षे पं. सुरेश बापट यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहेत. गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही परीक्षा ती उत्तीर्ण असून विदुषी मंजुषाताई पाटील व डॉ. स्वप्नील चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एमएम (संगीत) ही परीक्षा ती देणार आहे. खल्वायन, कल्याण गायन समाज, पं. केशवराव राजहंस स्मृती समारोह, नागपूर, अभिजात संगीत सभा, षड्ज पंचम इ. ठिकाणी तिचे शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. आकाशवाणीची शास्त्रीय ख्याल गायन व नाट्यसंगीत गायनाची ती मान्यताप्राप्त कलाकार आहे. अनेक नामवंत ठिकाणच्या शास्त्रीय ख्याल गायन व नाट्यसंगीत, गायन स्पर्धेत तिने पारितोषिके मिळवली आहेत.
गेली ८ वर्षे आषाढी एकादशीचा हा संगीतमय कार्यक्रम अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी मंडळातर्फे साजरा होत आहे. सप्तसूर म्युझिकल्सचे वादक साथीदार यांचा महत्वपूर्ण सहभाग या कार्यक्रमात असतो. यंदाचे आषाढी एकादशी भक्तिरंग या कार्यक्रमाचे ९ वे वर्ष आहे. कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनाशुल्क असून, अभिषेक काळे व सृष्टी कुलकर्णी या नावाजलेल्या युवा कलाकारांचा अभंग – भक्ति गीत गायन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी मंडळ व सप्तसूर म्युझिकल यांनी केले आहे.