ऑल इंडिया गेम फिशिंग असोसिएशनचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : ऑल इंडिया गेम फिशिंग असोसिएशनने शाश्वत आणि पर्यावरण स्नेही मासेमारीचा संदेश देण्यासाठी मालवण तालुक्यातील तोंडवळी समुद्रकिनारी आयोजित केलेल्या गळाने मासे पकडण्याच्या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील सच्चिदानंद उर्फ बंटी मेस्त्री याला स्पीसीस चॅम्पियन ( प्रजाती चॅम्पियन ) म्हणून गौरविण्यात आले. त्याने ‘गिटार फिश ‘ नामक ३ किलो ८०० ग्रामचा मासा आपल्या गळाने पकडला होता.
तोंडवळी समुद्रकिनारी दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशभरातून तब्बल ९० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत रत्नागिरीच्या अभि सावंत यांनी वर्ल्ड सर्फ चॅम्पियनशिपचा किताब पटकावला. त्यांना अली हुसेनी मेमोरियल कप २०२२ व रोख रक्कमेसह अनेक आकर्षक बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
चेन्नईचा सय्यद निहाज अहमद द्वितीय तर केरळचा जेम्स कुटी तृतीय ठरला. सावंतवाडी तालुक्यातील मळगांव येथील सच्चिदानंद मेस्त्री चतुर्थ क्रमांकचा मानकरी ठरला तसेच त्याला स्पीसी चॅम्पियन म्हणून गौरविण्यात आले.
तळाशील समुद्रकिनारी पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मच्छीमारांना शाश्वत मासेमारीचा संदेश देणे हा या मागचा उद्देश होता तसेच या स्पर्धेमुळे तोंडवळी तळाशील मधील पर्यटन व्यवसायाला भविष्यात मोठी चालना मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
विशेष म्हणजे स्पर्धा पार पडल्यानंतर स्पर्धकांच्या गळाला लागलेले सर्व मासे आवश्यक ती माहिती व छायाचित्रे घेतल्यानंतर जिवंतपणे समुद्रात सोडण्यात आले. तोंडवळी समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनी या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.
Sindhudurg