माझे कोकण….. संतोष वायंगणकर
महाराष्ट्रात ज्या भागामध्ये शेतकरी पावसाची प्रतिक्षा करायचा त्या भागात पावसाने केव्हाचीच नुसती हजेरी लावली असे नव्हेतर नद्या-नाले दुथडी भरून वाहतील अशी स्थिती निर्माण केलीतर दुसरीकडे कोकणामध्ये मृग नक्षत्राच्या दिवशी पाऊस नुसती हजेरीच लावत नाहीतर कोकणातील पावसाचे आगमन अगदी वेड्यासारख, पिसाटल्या सारख होत असत. लोकांनी मनातल्या मनात किंवा अगदी गाव गप्पां मारत असताना शिव्या घातल्या तरीही पावसाला जेवढ बरसायच तेवढच तो बरसतो आणि जेव्हा पाठ फिरवायची तेव्हा तो आर्जव, विनवण्या करूनही येत नाही. कोकणात मृग नक्षत्राला पाऊस नाही असं कधी झालं नाही. परंतु यावर्षी मृग नक्षत्राला पाऊस आला नाही. जस काही एप्रिल-मे महिन्यात उन्हाळा असावा किंबहुना त्यापेक्षाही अधिक कडक असणारा उन्हाळा यावेळी जाणवला. घामाच्या धारांनी ओलेचिंब होण्याची वेळ शेतकऱ्यांवर, सर्वसामान्यपणे सर्वांवर आली. ‘यंदा मिरग सुको गेलो’ यावर मग कोकणच्या मुलखामध्ये ‘गजाली’ रंगल्या नसत्या तरच नवल. परंतु सर्व कोकणवासियच पावसाच्या उशिराच्या आगमनाने धास्तावले होते. पाऊस कधी पडणार अशीच अस्वस्थ करणारी स्थिती समाजात निर्माण झाली होती आणि अखेर एकदाचा पाऊस आला. परंतु खरतर तो नेहमीसारखा आलाच नाही. पावसाची कोकणातील ‘एन्ट्री’ म्हणजे आसमंत दणाणतच त्याच आगमन असत. गुडगुढी म्हातारीचे आवाज नाहीत की आसमंतातल लाईटींग नाही यातल काहीच न करता तो तसा निमुटपणे उशिराने हजर झाला. यामुळे सहाजिकच शेतकरी थोडा फार सुखावला. सुरूवातीला शेतीच्या कामाला सुरूवात कशी करायची याच्या नियोजनाने शेतकरी हैराण होता. त्याच कारण भात पेरणी, जमिनीची उखळ, जमिनीची दुबार नांगरणी असे कितीतरी प्रश्नांची उत्तर सापडत नव्हती. मात्र, तरीही तो आनंदी मनाने भात पेरणी करता झाला. पुन्हा पाऊस पाठ फिरवतो की काय अशी शंका सर्वांना येत होती. परंतु जमिन भिजवण्यापुरता पाऊस येत आहे. जून महिन्याच्या सुरूवातीला भाताची पेरणी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात होत असते आणि जूनच्या सुरूवातीलाच त्या पेरणी केलेल्या भाताची लावणी केली जाते. जून महिन्यात कोकणातील शेतकऱ्याला अजिबात उसंत नसते. भात लावणी आटोपल्यावरच शेतकरी थोडाफार शेती कामातून मोकळा असतो. परंतु बदलत्या ऋतुचक्रामध्ये शेतकऱ्याच स्वत:च दरवर्षी केलेलं नियोजन ढासळत आहे. शेतकरी तरीही यातूनही उभारी घेण्याचा प्रयत्न करतोय. गेल्याकाही वर्षात हे सर्व विचित्र होत असतानाही भातशेतीच प्रमाण कोकणात वाढत आहे. कोकणातील घरांमध्ये वयोवृद्धांची संख्या फारमोठी आहे. जे तरूण कोकणात आहेत त्यातील बहुतांश तरूण फळ बागायती, भातशेतीत राबताना दिसतात. यामुळेच भातशेती लावणीचे प्रमाण वाढलेले दिसते. पूर्वी कोकणातील तरूणांना काम करायला नको म्हणून शिक्के मारलेले असायचे आज हेच तरूण मोठ्याप्रमाणात शेती करतात. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनेक संस्था त्यांना मार्गदर्शन करतात. यामुळे शेती क्षेत्राला पुन्हा एकदा बरे दिवस येत आहेत. कोकणाकडे पहाण्याचे चष्मे बदलले पाहिजेत. कोकणात शेती क्षेत्रात काम करणाऱ्या तरूणांना आपणच प्रोत्साहन दिलं पाहिजे. विशेषत: फळ बागायतीतही तरूण काम करत आहेत. कलिंगड लागवड करून मोठ उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. फळमाशीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनियमित असणाऱ्या पावसाचा परिणाम हा जाणवतोच आहे. शेतीतील सगळयाच गोष्टी लांबणीवर पडत आहेत. मात्र, तरीही कोकणातील शेतकरी कधी हार मानत नाही. तो प्रयत्न करीत रहातो. म्हणून परूळे गावातील प्रगतशिल शेतकरी प्रदिप प्रभू शेती क्षेत्रात आदर्श निर्माण करीत शेतीतून उत्तम उत्पन्न घेऊ शकतो.
हा वास्तुपाठच देत आहेत. पारंपारिक शेती करत असताना शेती क्षेत्रात आधुनिकता येत आहे. आपल्या शेतातही आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. तरच शेतकऱ्याला चांगल उत्पादन आणि त्यातून चांगल उत्पन्न मिळू शकेल. निसर्गाचा लहरीपणा अलिकडे वाढत चालला आहे. त्याची कारणही तशीच आहेत. मानवाकडून निसर्गावर मात करण्याचा जो अट्टाहासीपणा चालला आहे त्यामुळे भविष्यात यापेक्षाही भयावह स्थिती निर्माण होईल आपण जर वेळीच सावध झालो नाही आपली बदललेली जीवनपद्धती बदलली नाही तर फार मोठ्या संकटाला सामोरे जावं लागेल. त्यासाठी वेळीच सावध व्हायलाच हवे. आजची स्थितीने पावसाच्या उशिराच्या आगमनाने थोडफार तरी सावरेल पण पुढच काय प्यायलाच पाणी असेल की नाही त्याचीही कोणीही शाश्वती देता येणार नाही.