आषाढी एकादशी निमित्त लिटिल चॅम्प्स जानवळे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

पाटपन्हाळे l वार्ताहर :    गुहागर तालुक्यातील जानवळे येथील लिटिल चॅम्प्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांनी दिंडी काढण्यात आली. यावेळी पावसाने अधून मधून जोरदार हजेरी लावली. या दिडींत चिमुकल्यांनी वारकरी पारंपरिक वेशात ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला’ असा गजर करत श्री विठुरायाची पालखी खांद्यावर घेत दिंडी काढली. शृंगारतळी बाजारपेठेत रिंगण करून,’विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला’ या गाण्यावर डान्स करण्यात आला.

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज व महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालख्या आळंदी देहू पासून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पंढरपूराला जातात. वारीची ही परंपरा, संत परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना समजावी तसेच प्रत्यक्ष वारीचा अनुभव यावा याकरिता दरवर्षी दिंडीचे आयोजन करण्यात येते. यावेळी डोक्यावर तुळस घेऊन पालखी खांद्यावर घेत श्री विठुरायाच्या गजरात मुलांनी ठेका धरला होता. यामध्ये मुले व मुली श्री विठ्ठल रूक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, जनाबाई, नामदेव, सोपानदेव यांची वेशभुषा करून सहभागी झाले होते.