आषाढी एकादशी आणि ईद पार्श्वभूमीवर आचरा पोलीस स्टेशन कडून शुभेच्छा

आचरा | अर्जुन बापर्डेकर : आषाढी एकादशी आणि बकरी ईद निमित आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी हिंदू मुस्लिम बांधवांना भेट देवून शुभेच्छा दिल्या.
आचरा गाव सर्व धर्म समभाव जोडून एकत्र सलोख्याने नांदणारे गाव म्हणून ओळखले जाते .या गावात हिंदू मुस्लिम, ख्रिश्चन,बौद्ध धर्मिय सलोख्याने, एकमेकांच्या सन उत्सवात आनंदाने सहभागी होत साजरा करतात.यावेळी आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यामुळे हिंदू बांधवांनी एकादशी निमित्त रामेश्वर मंदिर येथील विठ्ठल मंदिरात पहाटे काकड आरती,सायंकाळी भजने दिंडी तर पिरावाडी येथील विठ्ठल मंदिरात मधलावाडा ग्रामस्थ सभा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर मुस्लिम बांधवांतर्फे ईद निमित्त सकाळी सात वाजता नमाज पढण्यात आली.त्यानंतर कुर्बानी आदी कार्यक्रम करण्यात आले. यानिमित्त आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी आचरा काझीवाडी येथील मशीदीला भेट देत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर विठ्ठल मंदिरात विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेत हिंदू बांधवांनाही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.