मनसे खेड तालुकाध्यक्षपदी संदीप फडकले यांची निवड

 

चिपळूण :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुकाध्यक्षपदी कामगार नेते संदीप फडकले (असगणी, ता. खेड) यांची निवड झाली आहे. ही निवड मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केली असून फडकले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे घेतलेल्या मेहनतीची पोचपावती असल्याची प्रतिक्रिया संदीप फडकले यांनी दिली असून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

असगणी ता. खेड येथील तरुण कार्यकर्ते संदीप फडकले गेल्या काही वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन ते मनसे पक्षात कार्यरत आहेत. माथाडी कामगार महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीसपदी कार्यरत असताना पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळ असो अथवा महापूर काळ असो या कालखंडात गरजुना नेहमीच मदतीचा हात दिला. या साऱ्या कामगिरीची दखल घेऊन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी संदीप फडकले यांच्यावर खेड तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. यावेळी मनसे नेते शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, भूषण चिखले यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

या निवडीबाबत फडकले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मनसे पक्षात पदार्पण केल्यापासून पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदाची अपेक्षा न बाळगता पक्ष आणि संघटना वाढीसाठी अविरत प्रयत्न केले. आता पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्यावर मनसे खेड तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. जो आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. मनसैनिक व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन गावागावात मनसे पक्ष रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातील. लोकोपयोगी उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही दिली.