अभंगवाणीमध्ये रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

 

रत्नागिरी : कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि रत्नागिरीतील संगीतप्रेमी कलाकार आयोजित ‘अभंगवाणी’ या अभंग-भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने आषाढी एकादशीची पूर्वसंध्या भक्तिमय झाली. बाहेर पडणारा पाऊस आणि राणी लक्ष्मीबाई सभागृहात विठ्ठल नामाच्या गजरात रसिक मंत्रमुग्ध झाले.

सुप्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती झाली. राणी लक्ष्मीबाई सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात आनंद पाटणकर, श्वेता जोगळेकर, संध्या सुर्वे, करुणा पटवर्धन, तन्वी मोरे आणि अभिजित भट यांनी अभंगगायन केले. सुरवातीला कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी सर्व कलाकारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सुंदर ते ध्यान या विठुरायाच्या रुपावलीने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर नाम गाऊ नाम ध्यावी, संतांचिया गावी, आषाढीला जमतो भक्तांचा हा मेळा, राजस सुकुमार, मिळे आवडीचे सुख, वृंदावनी वेणू, आधी रचिली, सगुण संपन्न पंढरीच्या राया, अवघाची संसार सुखाचा करीन, काळ देहासी आदी बहारदार गीते सादर झाली. मध्यंतराला ईरा गोखले या बालगायिकेने रखुमाई रखुमाई हे गीत सादर करून रसिकांची दाद मिळवली. अच्युता अनंता या भैरवीने मैफलीची सांगता झाली.

कार्यक्रमात विजय रानडे, चैतन्य पटवर्धन (संवादिनी), विलास हर्षे, श्रीरंग जोगळेकर (ऑर्गन), उदय गोखले यांनी व्हायोलिनसाथ, हेरंब जोगळेकर, केदार लिंगायत, संजू बर्वे (तबला), मंगेश मोरे यांनी सिंथेसायझरासाथ, तर अद्वैत मोरे आणि राघव पटवर्धन या बालकलाकारांनी तालवाद्याची साथ केली. राजू जोशी यांचे नेटके निवेदन आणि एस. कुमार साउंडचे उदयराज सावंत यांचे उत्तम ध्वनिसंयोजन यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.