शिपोशी हनुमान वाडी नदीवरील पुलाजवळ बांधला बंधारा
शिपोशीचे ग्रामस्थ राजन शिंदे व पंचक्रोशी ग्रामस्थांची तहसीलदारांकडे तक्रार
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील शिपोशी हनुमानवाडी येथे काजळी नदीवरील पुलाजवळ अनधिकृतपणे बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसण्याचा तसेच जीवित आणि आर्थिक हानी होण्याची शक्यता असल्याने हा बंधारा तात्काळ हटवावा अशी मागणी येथील ग्रामस्थ राजन शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लांजा तहसीलदारांकडे केली आहे.
लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात ग्रामस्थ राजन शिंदे व अन्य ग्रामस्थांनी म्हटले आहे की मौजे शिपोशी हनुमान वाडी येथे काजळी नदीवर अज्ञात व्यक्तींनी कोणाचीही परवानगी न घेता अनधिकृतपणे आणि बेकायदेशीरपणे कोणतीही तांत्रिक मदत न घेता बंधाऱ्याचे बांधकाम केलेले आहे. हा अनधिकृत बंधारा साठ फूट लांबीचा आणि चार फूट उंचीचा आहे.
हा बंधारा चुकीच्या जागेवर आणि चुकीच्या पद्धतीने बांधला गेला असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात लिकेज असून यामुळे नदीपत्रातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतीत बसून शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून ते तो फुटल्यास जीवित हानी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. तसेच येथील पुलाला देखील धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे भविष्यात या अनधिकृत बंधार्यामुळे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी हा अनधिकृत बंधारा तात्काळ हटवावा, अशी मागणी ग्रामस्थ राजन शिंदे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीची निवेदन लांजा तहसीलदार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना देखील सादर करण्यात आले आहे.