गुहागर | प्रतिनिधी :
तालुक्यातील पाटपन्हाळे येथील न्यू इंग्लिश स्कूल व इंग्लिश मिडीयम शाळेतील १ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी वरवेली परिसरातील सेंद्रिय शेती प्रकल्पाला शैक्षणिक क्षेत्रीय भेट दिली.
या भेटीदरम्यान शेतकरी किर्वे यांनी विद्यार्थ्यांना रासायनिक शेतीचे दुष्परिणाम, सेंद्रिय शेतीचे फायदे तसेच पोषक व सुरक्षित अन्न उत्पादनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. शेणखत निर्मिती, सेंद्रिय खते, जैविक कीडनियंत्रण आदींची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.
विद्यार्थ्यांनी शेतातील फळबाग, भाजीपाला व औषधी वनस्पतींचे निरीक्षण केले. पर्यावरणपूरक शेतीचे ज्ञान घेताना त्यांनी त्यातून निर्माण होणाऱ्या अन्नातील पोषक घटकांचीही माहिती मिळवली. मुख्याध्यापिका संदिकर यांनी शेतकरी किर्वे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सकारात्मक क्षेत्रभेटी पुढेही आयोजित करण्याचा विश्वास व्यक्त केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, पर्यावरण आणि शाश्वत शेतीचे महत्त्व अधोरेखित झाले.













