अपघातात कणकवलीतील शेखर राणे व त्यांच्या पत्नी जखमी
वैभववाडी l प्रतिनिधी : चालकाचा ताबा सुटल्याने करूळ घाटात वॅग्नर खोल दरीत कोसळली. या अपघातात शेखर मनोहर राणे व दर्शना शेखर राणे रा. कलमठ हे बालबाल बचावले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री 9 वा. च्या सुमारास घडली. या अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रकचालक व करुळ सह्याद्री जीव रक्षकच्या साह्याने जखमींना दरीतून बाहेर काढले. या अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कोल्हापूरहून कणकवलीकडे शेखर राणे हे आपली वॅग्नर ( नं एमएच 04 – इटी – 5234) गाडीने करूळ घाट मार्गे जात होतै. करूळ घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वॅग्नर खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती इतर वाहन चालकानी करूळ चेक नाक्यावरील पोलीसांना दिली. नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलीस राहुल तळसकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वैभववाडी ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक प्रवीण देसाई व उपनिरीक्षक श्री खोत घटनास्थळी पोहचले. तसेच करूळ सह्याद्री जीव रक्षक टीम ही घटनास्थळी दाखल झाली. वॅग्नर खोल दरीत कोसळली होती. जवळपास 350 फूट दरीत गाडी दिसत होती. पोलीस तळसकर, ट्रक चालक तुकाराम कोकरे, शिवाजी दामोदर गायकवाड, अभिमन्यू संजय पाताडे व सह्याद्री जीव रक्षक टीमचे काही युवक दरीत उतरलै. दरीतून जखमींना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. नशीब बलवत तर म्हणूनच या दोघांचा अपघातात जीव वाचला आहे. जखमी शेखर राणे व दर्शना शेखर राणे यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.













