अभय कुणाचे ? सर्वसामान्यांचा सवाल
राजापूर l प्रतिनिधी : कोदवली पुनर्वसन वसाहतीमध्ये चालणाऱ्या अमलीपदार्थ व अनैतिक व्यावसायांबाबत सर्वत्र वृत्त प्रसिध्द होताच एकच खळबळ उडाली असून समाजातील अनेक जागरूक नागरिकांनी याचे स्वागत केले आहे. मात्र हे अमली पदार्थ विक्रीचे लोन हळू हळू तालुक्यात पसरले असल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत असून तालुक्यातील पाचल, सौंदळ, डोंगर व साखरीनाटे परिसरात या टोळक्याने आपले विक्रीचे केंद्र बनविल्याची जनतेत उघडपणे सुरु आहे .
राजापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कोदवली पुनर्वसन भागात अमलीपदार्थ विक्रीच्या आडून अनैतिक व्यवसाय उघडपणे सुरु असल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस प्रसासन खडबडून जागे झाले आहे, तर यातील बड्या धेंडाच्या मुलांचे धाबे चागलेच दणाणले आहेत. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच अनेक जागरून नागरीकांनी त्याचे स्वागत केले असून अशा प्रवृत्तींचा समुळ बंदोबस्त संबधित यंत्रणेने केला पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मात्र या अमली पदार्थ विक्रीचे लोण आता तालुक्यातील अन्य भागातही पसरले असल्याचे पुढे आले आहे . तालुक्याच्या पुर्व भागात पाचल, सौंदळ परिसरातही अमली पदार्थ विक्री व अनैतिक व्यावसाय चांगलाच फोफावला असुन या भागातील सर्वसामान्य जनता यामुळे हैराण झाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी तरुण तरुणी या अमली पदार्थांच्या विळख्यात फसल्या असुन पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे . हिच स्थिती तालुक्याच्या पश्चिम किणारपट्टी भागातील साखरीनाटे जैतापूर परिसरातही असल्याचे बोलले जात आहे.
कोदवली साइनगर भागातील नागरिक या राजरोसपणे व भर वस्तीत चालणाऱ्या व्यावसायामुळे मेटाकुटीला आले असुन रात्री मुंबई गोवा माहामार्गावरील ब्रिजवर व ब्रिज खालील बायपासच्या बोगद्यात अमली पदार्थ सेवण करणारे व विक्री करणारे यांचा उपद्रव वाढला असल्याच्या या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. या ठिकाणी वाहतुकीला बंद असलेल्या पुलावर असणारा फोडलेल्या बिअरच्या बाटल्यांचा खच पाहता याला नक्की कुणाकुणाचे अभय आहे असा प्रश्न आता सर्वसामान्यान्मधुन विचारण्यात येत आहे . या एकूणच प्रकाराकडे पोलीसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील कारवाई नाही – फारुख साखरकर
माजी सरपंच व तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष , डोंगर
राजापूर शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याची बाब राजापूर तालुका शांतता समितीच्या सभेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन दिली होती . राजापूरात आला गर्दुल्ले दिसु लागले आहेत यावर पोलिसानी वेळीच पायबंद घालावा अशी मागणीही आपण केली होती. मात्र याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही व अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही अशी खंत डोंगर गावचे माजी सरपंच फारूख साखरकर यांनी व्यक्त केली आहे. डोंगर गावातही अशाच प्रकारे अनेक प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.