माखजन |वार्ताहर : ज्ञान हे शिकवता येत पण कला ही अशी गोष्ट आहे की ती उपजत असावी लागते.त्या मुळे प्रत्येकाने आपल्या कडे कोणती कला आहे याचा पहिल्यांदा शोध घ्या.अभिनय क्षेत्रात अनेक करिअर करण्यासाठी संधी आहेत असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते,दिग्दर्शक, निर्माते अंशुमन विचारे यांनी केले.ते माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गुरुदक्षिणा सभागृहात विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधताना बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष आनंद साठे,उपाध्यक्ष मनोज शिंदे,सचिव राजेश फणसे,कलांगण चे निबंध कानिटकर,श्रीनिवास पेंडसे,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अंशुमन विचारे पुढे बोलताना म्हणाले की कोकणाला सांस्कृतिक वारसा मोठा आहे.खेळे,नमन,दशावतार,चवणी नाच याचा अभ्यास मुलांनी करावा. यातूनच आम्ही पुढे आलो असे त्यांनी नमूद केले.प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपण काय करू शकतो हे अजमवा आणी पुढे चला असा सल्ला दिला .टीव्ही स्क्रीन रोज पाहणाऱ्या अभिनेत्याला प्रत्यक्ष बोलताना पाहताना विद्यार्थ्यांना वेगळा अनुभव आला.
अंशुमन विचारे हे मूळ संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावाचे रहिवासी आहेत.लगत च्या गावातील विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मला खूप छान वाटले असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान या प्रसंगी संस्था अध्यक्ष आनंद साठे यांचे हस्ते अंशुमन विचारे यांचा शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.श्री आनंद साठे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव पोंक्षे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी मानले.













