डॉक्टरांना आपली मानसिकता बदलून रुग्णांना सेवा द्यावीच लागेल.!

भाजपा आ. नितेश राणे यांनी डॉ . धर्माधिकारी यांना दिला इशारा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचा घेतला आढावा

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वारंवार भेडसावत असणाऱ्या समस्या व प्रश्न याबाबत आढावा घेण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला शुुुुुुक्रवारी  भेट दिली. तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध प्रश्नांवर चर्चा देखील केली.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयातुन ओरोसला पेशंट रेफर करायचे नाहीत. पावसाळ्यात लोकांना सेवा द्यावी लागणार आहे. डॉ. धर्माधिका-यांना लातुरला जाताना तळमळ असते , तशी तळमळ इथे सेवा देताना दाखवा. आपल्याला लागणारी मदत आम्ही देवू. पण रुग्णालयात आलेला रुग्ण बरा होवूनच माघारी गेला पाहिजे. सेवा चांगली द्या, रुग्णांना इथुन बाहेर रेफर करु नका. जिथे काही अडचणी असतील, त्या आम्हाला सांगा. मात्र आम्ही याठिकाणी खोटी माहिती ऐकायला आलो नाही, तुमची खोटी आकडेवारी आम्हाला नको, या आकडेवारीने आम्ही समाधानी होणार नाही. या संदर्भात आपण आरोग्यमंत्र्याकडे जाणार आहे असल्याचे देखील आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

वैद्यकीय सेवा २४ तास असते, हे डॉक्टरांनी विसरुन चालणार नाही. उपजिल्हा रुग्णालयाची ओळख वेगळी न बनवता सर्वसामान्य गोरगरीब जनतेच हे रुग्णालय आहे त्यांना चांगले उपचार, चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. डॉक्टरांनी आपली मानसिकता बदलावी, रुग्णांना चांगली सेवा द्यावीच लागेल. जर रुग्णालय चालवायचे नसेल तर टाळे मारु, असा इशारा भाजपा आ. नितेश राणे यांनी डॉ . नागनाथ धर्माधिकारी यांना दिला आहे.

यावेळी अधिक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी, भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, माजी नगरसेवक संजय कामतेकर, भाजपा शहराध्यक्ष आण्णा कोदे व उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणारे डॉ. महेंद्र आचरेकर, डॉ. धनंजय रासम, डॉ. आदित्य शेळके, इतर डॉक्टर, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्टाफ चांगली सेवा देत नाही, कामापेक्षा सुट्टीवर जास्त असतो . सोनोग्राफी, एक्सरे, रक्ततपासणी वेळेवर होत नाही. रुग्णांना ओरोस, कुडाळ किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये रेफर केल जात. हॉस्पिटल चालवायचे नसेल तर टाळे मार , तुम्हाला सर्वांना ओरोसला पाठवुयात आणि बाहेर बोर्ड लावू. जर दर्जेदार सेवा मिळत नसेल , तर काय उपयोग ? नवीन तरुण डॉक्टर आले आहेत. त्यांना रुग्णालय प्रमुख म्हणून तुम्ही ही शिकवण देता का ? काही डॉक्टर घरी जास्त आणि रुग्णालयात कमी असतात. तुमच्या ड्युटीवर सेवा दिली पाहिजे. या रुग्णालयात इनकमिंग ठेवा आऊट गोईंग बंद करा. आलेल्या १० पेशंटमध्ये २ जीवंत जातात, ही ओळख बरोबर नाही, अशा समस्या सांगत आ. नितेश राणे यांनी मांडल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

त्यावर डॉ. धर्माधिकारी यांनी डॉक्टर चांगली सेवा देत आहेत, असे म्हटले त्यावेळी आ. राणे यांनी आपले पेशंट ओरोसला का पाठवले जातात ? ते सांगा. त्यावेळी डॉ. धर्माधिकारी यांनी ICU विभाग बंद स्थितीत आहे. त्यासाठी स्टाफ नाही. डॉ. आचरेकर मॅडम यांनी लहान मुलांचा आयसीयु नाही, एक स्त्रीरोगतज्ञ व भुलतज्ञ हवा आहे असे सांगितले. तसेच रुग्णालयातील कर्मचा-यांनी रक्तपेढी , औषधसाठा व कार्यालयीन काम काजासाठी कर्मचा-यांची मागणी केली.

या दरम्यान संजय कामतेकर यांनी तुमचे पेशंट रेफर केले जातात. ओरोस आणि सावंतवाडीला का पाठवता ? अशी विचारणा केली. तसेच आ. राणे यांनी किती तास सेवा देता ? अशी विचारणा केली तेव्हा डॉ. अर्पिता आचरेकर यांनी मुलांचे आजारपण असल्याचे कारण दिले. यावेळी आ. नितेश राणे यांनी संतप्त होत तुमच्या अडचणी काय आहेत ? यावेळी डॉ. आचरेकर यांनी आपण सेवा देत असल्याचे सांगितले. त्यावर आ. राणे यांनी लोकांच्या तक्रारी का होतात ? तुम्हीच तोडगा सांगा तुम्ही आम्हाला पर्याय द्या, रुग्णालयाची विश्वासाहर्ता कमी होणार ? तुम्ही जागेवरच नसता का ? हा वैयक्तिक विषय नाही. तुमच्यात नैतिका नाही का ? जनतेच्या प्रश्नापेक्षा तुमचे प्रॉब्लेम मोठे आहेत का ? असा सवाल आ. राणे यांनी केला व सल्ला देत मानसिकता बदला, रुग्णांना सेवा द्या, असे कडक शब्दांत सांगितले.

यावेळी डॉ. धर्माधिकीरी यांनी केवळ सिव्हील सर्जनला सांगितले काय ? तुमचे जबाबदारी संपली का ? अशी विचारणा आ. राणे यांनी करत तुम्ही तुमची खुर्ची मोकळी ठेवू शकत नाही . रिकाम्या खुर्च्या भरायला पाहिजे. एनआरएचएम अंतर्गत भरती करा. ऑन कॉल डॉक्टरांना बंद केले. पहिले ऑन कॉल डॉक्टरांची सेवा द्यावी, सिटीस्कॅन सेवा खाजगी रुग्णालयात एनआरएचएम या योजनेअंतर्गत सुरु करा, अशी सुचना आ. राणे यांनी केली.

यावेळी सर्व डॉक्टरांनी आ. नितेश राणेंकडे ऑनकॉल डॉक्टरांची सेवा सुरु करा अशी मागणी केली. तेव्हा आ. राणे यांनी तातडीने सिव्हील सर्जनना फोन लावत ऑन कॉल चालू करण्याचा सुचना केल्या. तुमच्या लोकांची इच्छाशक्ती नसेल काम करण्याची ? तर त्याचा अर्थ काय ? लोक सांगताहेत सेवा मिळत नाही. तुम्ही काय सांगताहेत कारभार चांगला आहे. तुमच्याशी देणे – घेणे नाही. डॉ . धर्माधिकारी कुठे राहतात ? काय करतात ? मला वैयक्तिक संबंध जोडायचे नाहीत. लोक फोन करतात, तुम्हाला सेवा द्यायचीच नसेल तर काय उपयोग ? सरकारी रुग्णालय वाटलं पाहिजे, असे तुम्हाला वाटत का ? दम दिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दिसत आहात. तुमच्या मानसिकतेला सुधारा, बदला, सुट्टया कमी घ्या. तुम्ही लातुर मध्ये असे काम करणार का ? तुम्ही कोकणात आहात म्हणून असे काम करता अशी विचारना डॉ. धर्माधिकारी यांनी आ. नितेश राणे यांनी केली. त्यावेळी डॉ. धर्माधिकारी निरुत्तर झाले.

*बॉक्स*

बालाजीचे दर्शन घ्या, पण रुग्णांना सेवा द्या …

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील समस्या सांगण्यासाठी आ. नितेश राणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांना फोन केला असता आपण बालाजीच्या दर्शनाला गेलो असल्याचे सांगितले. त्यावेळी संतप्त आ. नितेश राणे यांनी पहिल्यांदा कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील समस्या जाणून घ्या. रुग्णांना चांगली सेवा दिली तरच बालाजी पावणार … अडचणी आहेत त्या सोडवा, अशा सुचना आ. नितेश राणे फोनवर डॉ. नागरगोजे यांना दिल्या.

*बॉक्स …*

मुलाचा सातवा वाढदिवस तरीही जनतेच्या प्रश्नासाठी आपण इथवर आहे…

आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. गोरगरीब जनतेला या रुग्णालयात चांगली सेवा मिळावी यासाठीच ही बैठक आहे. मला कणकवली विधान सभेतील मतदारांनी २०२४ पर्यंत आमदार म्हणून निवडून दिले आहे. म्हणून त्यांचे प्रश्न सोडवणूकीला प्राधान्य आहे. मी १६ – १७ तास काम करतो कुटुंबियांना वेळ कमी देतो, हा राणे कुटुंबियांचा त्याग आहे. माझ्या घरात मुलाचा सातवा वाढदिवस आहे, तरी देखील ही आढावा बैठक घेतली असल्याचे सुनावत रुग्णांना चांगली सेवा द्या पंधरा दिवसांनी पुन्हा आढावा बैठक घेऊ असेही सांगितले.

फोटो ;

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात वारंवार भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करताना आ. नितेश राणे व कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागनाथ धर्माधिकारी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते.. (छाया – मयुर ठाकूर कणकवली )