एकूण पाच जणांना केले अटक
दोन वर्षांपूर्वीचा खवले मांजराच्या शिकारीचा गुन्हा झाला उघड
खेड | प्रतिनिधी : विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) यांना मौजे लोटे परशुराम , हॉटेल सदगुरू समोर महामार्गावर दोन अज्ञात व्यक्ती खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करणेकरीता येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
त्यानुसार दि. २५/०६/२०२३ रोजी वनविभागाचे अधिकारी / कर्मचारी यांनी सापळा रचून दोन संशयित आरोपी व त्यांचेकडील वन्यप्राणी खवले मांजर यांचे खवले ०.९३० किलोग्रॅम इतके जप्त करून ताब्यात घेतले. सदर आरोपींना न्यायदंडाधिकारी, खेड यांचेकडे दि. २६/०६/२०२३ रोजी हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना पुढील चौकशीकामी दि २८/०६/२०२३ पर्यंतची पोलीस कस्टडी दिली.
अटक आरोपी १) श्रीम. मिना मोहन कोटिया रा. लोटे पटवर्धन २) श्री. मिलिंद वसंत सावंत रा. मालाड मुंबई यांचेकडे वनविभागाने कसून चौकशी केली असता सदर गुन्हयामधील फरार आरोपी. राजाराम वामन पगारे रा. मुंब्रा जि. ठाणे यांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर आरोपी श्री. राजाराम पगारे यांना दि. २८/०६/२०२३ रोजी मौजे मुंब्रा ठाणे या ठिकाणी जावून ताब्यात घेवून न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग-१ खेड यांचेसमोर वरील आरोपी क्र. ०१ ते ०३ यांना हजर केले असता आरोपी क्र. ०१ ते ०३ यांना दि. ३०/०६/२०२३ पर्यंतची पोलीस कस्टडी देण्यात आली. आरोपी श्री. राजाराम पगारे यांचेकडे सदर गुन्हयाबाबत अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्हयाची कबुली देवून गुन्हयामध्ये समाविष्ट आरोपी श्रीकांत तानाजीराव भोसले रा. बिजघर (मावळतवाडी) या आरोपीची माहिती दिली. त्याअनुषंगाने मौजे. बिजघर मावळतवाडी या ठिकाणी जावून आरोपी श्री. श्रीकांत भोसले यास ताब्यात घेऊन तपास केला असता सदर गुन्हयातील जप्त केलेले खवले हे मौजे. बिजगर कातकरवाडी येथील योगेश युवराज निकम यांचेकडून ०२ वर्षांपूर्वी घेतले असल्याची कबुली दिली.
त्यानुसार श्री. श्रीकांत भोसले व श्री. योगेश निकम या दोन्ही आरोपीस ताब्यात घेवून अटक करण्यात आली.
वरील सर्व ०५ आरोपीस दि. ३०/०६/२०२३ रोजी न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग -१ खेड यांचे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वरील सर्व आरोपी यांनी पूर्वनियोजन करून खवले मांजराची शिकार करून त्याच्या खवल्यांची विक्री करण्याचा गुन्हा केला आहे. तब्बल ०२ वर्षापूर्वी शिकार केलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची विक्री होत असताना वनविभागाने शिताफीने सर्व आरोपींना अवघ्या ०४ दिवसात ताब्यात घेण्यास यश प्राप्त झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये वनविभागाचे कौतुक होत आहे.
सदरची कार्यवाही श्री. आर. एम. रामानुजम, मुख्य वनसंरक्षक (प्रा), कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), श्री. वैभव बोराटे, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण), श्री. प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली, श्री. सु. आ. उपरे, वनपाल खेड, श्री. अ. रा. दळवी, वनपाल मंडणगड, श्री. सा.स. सावंत, वनपाल दापोली, वनरक्षक श्री. अशोक ढाकणे, श्री. परमेश्वर डोईफोडे, श्री. रानबा बंबर्गेकर, श्रीम. प्रियांका कदम, श्रीम. शुभांगी भिलारे, श्री. सुरज जगताप, श्री. गणपत जलणे, श्रीम. शुभांगी गुरव यांनी पार पाडली. पुढील तपास श्री. प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली हे करीत आहेत.