उद्धव ठाकरे ‘कफनचोर’

कोविड सेंटर घोटाळ्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : उद्धव ठाकरेंनी जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला. आतापर्यंत मयताच्या टाळूवरील लोणी खाणारे असे म्हटले जायचे. यांनी तर त्यापुढे जाऊन बोगस डॉक्टर दाखवले आणि शवांसाठी मागवलेल्या पॅकींग पिशव्यांमध्येही घोटाळा केल्याने त्यांना ‘कफनचोर’च म्हणावे लागणार असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार हल्लाबोल केला.

कोविड काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये ठाकरेंनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्यात आता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा थेट ‘कफनचोर’ असा उल्लेख केल्याने नव्या वाकयुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल भाष्य केले.

कोविड काळातील घोटाळ्यात असे ३५ डॉक्टर समोर आले आहेत, त्यांनी कोविड सेंटरमध्ये कामासाठी केवळ अर्ज केले होते. मात्र, सेवा दिली नाही. तरीदेखील त्यांच्या नावाने पूर्ण बिल काढण्यात आले आहे. म्हणजेच कोविड सेंटरमध्ये कोण होते? असा प्रश्न उपस्थित होतो, असेही फडणवीस म्हणाले.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडलेल्या घोटाळ्यांची सर्व माहिती चौकशी झाल्यानंतर समोर येणार असल्याचा दावाही केला आहे. हा जनतेचा पैसा असून त्यांच्यावर आम्ही कारवाई करणारच, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

मुंबई महापालिकेत आम्ही ठाकरे गटाच्या शिवसेनेतून २०१७ मध्येच बाहेर पडलो आहोत. ठाकरे गटाच्या गोरखधंद्यात आम्ही त्यांना साथ देणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सध्या राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना भ्रष्टाचारापासून मुक्त होण्याची अपेक्षा आहे. सर्वसामान्य नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन असून मोदींच्या योजनेत भ्रष्टाचार होत नाही. म्हणूनच सर्वसामान्य नागरिक भाजपला पाठिंबा देत असल्याचा दावाही फडणवीसांनी यावेळी केला.