नाणीज क्षेत्री उद्या गुरुपौर्णिमा उत्सव

सुंदरगडावर भाविकांची गर्दी

नाणीज : नाणीजक्षेत्री सोमवारी (३ जुलै २०२३ रोजी) गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यावेळी जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांचे संतपीठावरून केले जाणारे विधिवत पूजन सर्वांचे आकर्षण असेल.
जोरदार पाऊस असूनही सुंदरगडावर राज्यातील विविध भागातून तसेच गोवा, गुजरात, कर्नाटक,छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश इत्यादी अनेक राज्यातून सुद्धा भाविक दाखल झाले आहेत.
हा सोहळा रविवापासून सुरू होत आहे. त्यादिवशी नैमित्तिक विधीनंतर सकाळी ११वाजता सप्तचिरंजीव महामृत्युंजय याग सुरू होईल. अन्नदान विधीही होईल. सर्व सोहळ्याचे पौरोहित्य वे द.शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचेगुरुजी करणार आहेत.

सर्व देवदेवतांना या सोहळ्याची निमंत्रणे मिरवणूकांनी देण्यात येणार आहेत. नाथांचे माहेर, वरद चिंतामणी मंदिर, प्रभू श्रीरामचंद्र मंदिर, संतशिरोमणी गजानन महाराज मुख्य मंदिर येथे विविध जिल्हा सेवा समित्यांतर्फे ही निमंत्रणे वाजत- गाजत, जयघोष करीत देण्यात येणार आहेत.
सोमवारी सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. सकाळी ८ ते १२ गुरुपूजन सोहळा होईल. सुंदरगडावरील हजारोभाविक एकाच वेळी मंत्रघोषात विधीवत पूजन करतील. त्यावेळी संतपीठावर जगद्गुरू नरेंद्राचार्यचार्यजी महाराज स्थानापन्न असतील. तिथे भविकातर्फे प्रातिनिधीक पूजन होईल. गुरुपूजनाचा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेरणारा असतो
या दिवसभरात भरगच्च कार्यक्रम आहेत. चरण दर्शन, पालखी परिक्रमा, यागाची व अन्नदान विधीची समाप्ती होईल. सायंकाळी ७.३० ते ८.३० प.पू. कानिफनाथ महाराजांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. देवाला साकडे घालून सोहळ्याची सांगता होईल.
दरम्यान सुंदरगडावर सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. येथे भाविक येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुपूजन सोहळा हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा व आपुलकीचा विषय असल्याने या वारी उत्सवाला गर्दी प्रचंड असणार आहे. दिवस रात्र चोविस तास भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. भाविकांसाठी दोन दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.