रत्नागिरी | प्रतिनिधी : पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांनी तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या परीजणांची काळजी घ्यावी तसेच कोणत्याही ठिकाणी नियम व शांततेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देणार्या नागरिकांना तसेच पर जिल्ह्यातून येणार्या पर्यटकांना सूचना व आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा व त्या ठिकाणी असणारी पर्यटन स्थळे, असणारे अनेक धबधबे, पाण्याचे डोह, घाट व घाटांमध्ये असणारे अनेक सनसेट पॉईंट्स वर भेट देण्यासाठी अनेक पर्यटक व नागरिक येत असतात.
सध्या, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचे व वादळ वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे व परिणामी घाटामधील धुक्याचे प्रमाणात ही वाढ झाल्याची दिसून येत आहे, तसेच काही दरड प्रवण क्षेत्रांमध्ये, दरड कोसळण्याची शक्यताही जास्त आहे त्यामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे परिणामी वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
घाटांमधून प्रवास करणाऱ्या अथवा निसर्ग प्रेमी लोकांनी घाट माथ्यावर, अवजड वळणावर, सनसेट पॉईंट्स वर आपली वाहने उभी करून सेल्फी काढण्याकरिता थांबू नये तसेच धुक्यामुळे होणारे अपघात टाळण्याकरिता आपल्या वाहनाचे फॉग लॅम्पचा व परावर्तकांचा योग्य वापर करावा.
अतिवृष्टीमुळे घाटामधील असणारी जुनी व मोठी झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण देखील जास्त असल्याने, अश्या झाडांखाली आपली वाहने उभी करून ठेवणे देखील टाळावीत.
रत्नागिरी जिल्ह्यामधील असणार्या अनेक धबधब्यांमध्ये छोटे-मोठे दगड वाहून येत असल्याचे दिसून आलेले आहे तसेच धबधब्यांचा प्रवाह देखील जास्त प्रमाणांमध्ये आहे, जेणेकरून त्यामध्ये धबधब्यात उतरणारे लोक वाहून अथवा गंभीर इजा पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता तेथे जाणे टाळावे.
पावसाच्या पाण्याने तयार झालेल्या डोहामध्ये खोलीचा अंदाज येत नाही म्हणून अश्या ठिकाणी आपण तसेच लहान मुलांना घेऊन जाणे टाळावे.
अतिवृष्टीमुळे समुद्रामध्ये, धरण, पाणलोट क्षेत्र, नदी व नाल्यांमध्ये (पऱ्यांमध्ये) पोहण्याचा व तेथे भेट देण्याचा मोह टाळावा व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन श्री कुलकर्णी यांनी केले आहे.