लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव संपन्न

 

तसेच करिअर मार्गदर्शन, मान्यवरांची उपस्थिती

लांजा (प्रतिनिधी) समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा लांजा तालुका मराठा संघाचा उपक्रम हा निश्चितच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कौशल्याच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करून लांजा तालुका, जिल्ह्याचे नाव रोशन करावे असे आवाहन उद्योजक शिवाजी कोत्रे यांनी लांजा येथे केले.
लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने आयोजित समाजातील दहावी बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शहरातील लांजा नागरी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लांजा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजी कोत्रे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे हे होते .तसेच व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्ही. एम. ज्युनिअर कॉलेज जांजाचे प्राचार्य अनुराग पाणिग्रही, मराठा संघाचे शरद चव्हाण, राहुल शिंदे, संजय यादव, महेश खामकर आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. यावेळी करिअर मार्गदर्शन म्हणून बोलताना प्राध्यापक अनुराग पाणिग्रही म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पदवीपुरते शिक्षण न घेता व्यावसायिक शिक्षणाकडे वळावे. आयटी, आयआयटी या क्षेत्राकडे वळून आपले भवितव्य उज्वल करावे. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी आहे .कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा. स्वतःबरोबरच आपल्या समाजाची प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न करा. आपल्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी करा. आई-वडीलांप्रती कायम आदर ठेवा. आयुष्यात काहीही कमी पडणार नाही असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या आयुष्यासाठी मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे यांच्यासह विजय पाटोळे, शरद चव्हाण, सतीश राणे, सुनील कुरूप, महेश खामकर, प्रकाश जाधव, राहुल शिंदे, राजू जाधव, प्रकाश सावंत, संजय साळवी, समीर सावंत, प्रमोद जाधव, मनोज लाखन, सुभाष पवार, ऋषिकेश चव्हाण, स्वप्ना सावंत, अनुराधा राणे, तिलोत्तमा खानविलकर, लीना जेधे, विलास साळुंखे आदींनी प्रयत्न केले.