पालवण सरपंच अश्विनी पांचाळ यांनी शिक्षक गावात राहत असल्याचा दिला खोटा दाखला

भरत सावर्डेकर यांनी केली गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील ग्रामपंचायत पालवणचे सरपंच अश्विनी पांचाळ यांनी शिक्षक संजय दत्तात्रय गोखले, स्नेहल संतोष कुमार भुवड, दीपाराणी नितीन कोलहापूर, संजय अर्जुन जाधव, कविता नारायण पाटील यांना मुख्यालयी राहत असल्याचा खोटा दाखला दिला आहे. याबाबत मनसे कार्यकर्ते भरत सावर्डेकर याने पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
मुख्यालयी म्हणजेच गावातच न राहणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांविरोधात मनसे कार्यकर्ते भरत सावर्डेकर यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चिपळूण यांच्याकडे माहितीच्या अधिकाराखाली तक्रार केली आहे. महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक गावात राहण्याचा कायदा असूनही शहरात राहतात. मात्र, ग्रामपंचायत पालवण सरपंच सौ. पांचाळ यांनी कायद्याचं उल्लंघन केले असून ग्रामसभेचा ठराव बंधनकारक असूनही सौ. पांचाळ यांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजीचा मुख्यालयी राहत असल्याचा खोटा दाखला दिला आहे. याशिवाय संबंधित शिक्षकांकडून घरभाडे करार किंवा घरमालकाची साधे पत्र देखील घेतलेले नाही.

सदरील बाब माहिती अधिकारी कार्यकर्ते भरत सावर्डेकर यांनी अधिनियमयम २००५ अन्वये दिनांक २६ जून २०२३ रोजीच्या प्राप्त पत्रान्वय उघडकीस आणले आहे. त्यामध्ये शिक्षक स्नेहल संतोष भुवड, सासरे यशवंत भुवड यांच्या नावे असलेल्या घरात भाड्याने राहत असल्याचे सांगून ग्रामपंचायतकडून मुख्यालय राहत असल्याचा दाखला प्राप्त केला आहे. शासनाची फसवणूक केल्याने शिक्षकांबरोबर सरपंच सौ. पांचाळ यांच्यावर २०० कोटी रुपयाच्या भ्रष्टाचारात सामील झाल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी श्री. सावर्डेकर यांनी केली आहे. याशिवाय पालवण गावचे ग्रामस्थ नयन सुर्वे यांचे रास्त धान्य दुकान नसताना सौ. पांचाळ यांनी रास्त धान्य दुकान चांगल्या प्रकारे चालवत असल्याचे मासिक सभेत २४ जानेवारी २०२३ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी नऊपैकी आठ सदस्यांचा विरोध असतानादेखील प्रोसिडिंगवर नोंद करून खोटा दाखला दिला आहे, असेही माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. शासनाची फसवणूक केल्याबद्दल सर्व शिक्षक, ग्रामपंचायत सरपंच सौ. पांचाळ आणि रास्त धान्य दुकानदार नयन सुर्वे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मनसे कार्यकर्ते श्री. सावर्डेकर व ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत पालवणच्या सरपंच सौ. आश्विनी पांचाळ यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत याबाबत खुलासा विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.