१५ हजार रुपये लंपास : चोरटा स्थानिक असण्याची शक्यता
बांदा : प्रतिनिधी
पाडलोस केणीवाडा येथील अविनाश मनोहर साळगावकर यांच्या घरी सोमवारी सकाळी दिवसाढवळ्या चोरी झाली. घरात कोणीही नसल्याचा अंदाज घेत चोरट्याने मागील दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला व १५ हजार रुपये लंपास केल्याचे उघड झाले. बांदा पोलीसात फिर्याद देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी अविनाश सागावकर हे नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता कामास निघाले. त्यांच्या पत्नी अश्विनी अंगणवाडी सेविका असून त्या ९.४५ वाजण्याच्या सुमारास कामाला गेल्या. त्या दुपारी दोन वाजता घरी आल्या असता त्यांना मागील दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात पाहणी केली असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याची खबर त्यांनी पोलीस पाटील रश्मी माधव यांना दिली.घरात कोणी नसल्याचे पाहत मागील दरवाजाची कडी तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. कपाटावर असलेली चावी घेत कपाट उघडून सर्व साहित्य अस्ताव्यस्त टाकले. एका कप्प्यात असलेले पंधरा हजार रुपये घेऊन चोरट्याने पोबारा केला केला.बांदा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा केला. चोरटा स्थानिक असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.