५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण
नाणीज:– नाणीजक्षेत्री निसर्गरम्य सुंदरगडाच्या साक्षीने आज लाखो भाविकांनी भर पावसात एकाचवेळी अपार श्रध्येने गुरुपूजन केले. दुपारी ५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी भाविकांना शुभाशीर्वाद देऊन आयुष्य आनंदी ठेवण्याबाबत उपदेश केला.
सुंदरगडावर पहाटेपासूनच धांदल सुरू झाली होती. भाविक आवरून गटागटाने मिळेल त्या जागी आसनस्थ झाले होते. आता पूजा विधी सुरू होण्याची सर्वांना प्रतीक्षा होती. सकाळपासून पावसाच्या सरीवरसरी कोसळत होत्या.
जगद्गुरूंचे आगमन-
सकाळी ८ च्या दरम्यान जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे आगमन झाले. भाविकांनी उभे राहून जयघोष करीत, त्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत सौ. सुप्रियाताई, प.पु. कानिफनाथ महाराज , सौ. ओमेश्वरीताई, देवयोगी असे सारे कुटुंबीय होते. प्रथम त्यांनी मंदिरात जाऊन गुरूंचे दर्शन घेतले . संतपीठावर आल्यावर महाराजांनी हात उंचावून सर्वांना आशीर्वाद दिले.
महाडिक दांपत्याची निवड-
संतपीठावर भाविकांतर्फे प्रातिनिधिक पूजेची संधी मिळत असते. ती यावेळी सौ. मीनाक्षी व मदन मारुती महाडिक यांना मिळाली. गुरुपूजनाचे ते मानकरी ठरले.
मंत्राघोषात गुरुपूजन –
महाराज संतपीठावर येताच संस्थानचे पुरोहित वे.शा.सं. भालचंद्रशास्त्री शौचेगुरुजींच्या नेतृत्वाखाली मंत्रघोष सुरू झाला. गुरुजी सांगतील त्यानुसार भाविकांनी गुरुपूजन सुरू केले.
एकाचवेळी घंटानाद-
गुरुजी पूजाविधी सर्वांना एकाचवेळी सांगत होते. प्रत्येकाकडे महाराजांच्या प्रतिमा होत्या. त्याचे पूजन सुरू झाले. एकाचवेळी गंध, हळद- कुंकू, फुले वाहिली जात होती. निरंजन एकाच वेळी प्रज्वलीत झाली. घंटेचा निनाद एकाचवेळी झाला. जवळजवळ चार तास गुरुपूजन विधी सुरू होता.
रुग्णवाहिका लोकार्पण –
महामार्गावरील जखमींवर तातडीने उपचार सुरू व्हावेत म्हणून राज्यातील सर्व महामार्गावर संस्थानच्या ४२ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्या तातडीने अपघातस्थळी जाऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचवतात. ही सेवा पूर्ण मोफत आहे. त्यातून गेल्या तेरा वर्षांत १९ हजारांवर जखमींचे प्राण वाचले आहेत. त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन आणखी ५ रुग्णवाहिकांचे आज लोकार्पण झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते हा सोहळा झाला. आता एकूण ४२ रुग्णवाहिका या सेवेत आहेत.
व्हॅनिटी व्हॅनचे लोकार्पण-
यावेळी एका व्हॅनिटी व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या पॉझिटिव्ह सोल फौंडेशनला ही व्हॅन संस्थांतर्फे भेट देण्यात आली आहे.
नामवंतांनी उपस्थिती-
सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, रत्नागिरी जिल्हा पोलीस उपसंधीक्षक विनीत चौधरी, मुंबईचे उपप्रादेशीक परिवहन अधिकारी अनिल वळवी, रत्नागिरीचे मोटार वाहन निरीक्षक अविनाश मोराडे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, राष्ट्रवादीचे अविनाश लाड आदी मान्यवर उपस्थित
यागाची समाप्ती-
काल सकाळी सुरू झालेला सप्तचिरंजीव महामृत्युंजय याग व अन्नदान विधीची आज समाप्ती झाली.
सर्वरोग शिबिराची सांगता-
सद्गुरू कादसिद्धेश्वर रुग्णालय काल सकाळपासून सुरु असलेल्या मोफत आरोग्य शिबिराची आज सांगता झाली. नामवंत डॉकटर्सनी येथे रुग्ण तपासणी व उपचार केले. भाविकांनी त्याचा लाभ घेतला.
२४ तास महाप्रसाद-
दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी येथे २४ तास महाप्रसादाची व्यस्था होती. भाविकांनी त्याचा लाभ घेतला. आज मध्यरात्रीपर्यंत महाप्रसाद सुरू होता.
अन्य राज्यांतूनही भाविक-
सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आलर होते. तसेंच गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश येथूनही मोठ्या संख्येने भाविक आले होते.
वाहनांच्या रांगा-
रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एस टी ने जादा गाड्यांची सोय केली होती. सुंदरगडावर सर्व मंदिरासमोर भाविकांच्या रांगा होत्या. मंदिरांवर रोषणाई करण्यात आली होती.